सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला रंगा वैद्य पुरस्कार

जांभेकर स्मारकासाठी पंचवीस वर्षे पाठपुरावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं स्मारक व्हावं, यासाठी सतत पंचवीस वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यंदाचा मानाचा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हा संघाला दरवर्षी हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. फेब्रुवारीत पालघर जिल्ह्यात होणार्‍या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्रात परिषदेशी संलग्न असलेल्या जिल्हा संघांच्यावतीने पत्रकारांच्या हक्काचे तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान परिषदेच्यावतीने करण्यात येतो. यापूर्वी नाशिक, भंडारा, नांदेड, पुणे आदी जिल्ह्यांना परिषदेच्यावतीने गौरविण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार पत्रकारांची पंढरी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघास जाहीर करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग ही बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे. आचार्य जांभेकर यांच्या जन्मभूमीत त्याचं स्मारक व्हावं यासाठी जिल्हा पत्रकार संघ गेेली पंचवीस वर्षे पाठपुरावा करतो आहे. अखेर जिल्हा संघाच्या या प्रयत्नास यश आले असून स्मारक लवकरच पूर्णत्वास जात आहे. परिषदेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान करताना त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेतली आहे. एवढेच नव्हे, तर जिल्हा संघाच्यावतीने इतरही विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा संघानं मागील डिसेंबरमध्ये परिषदेची कार्यशाळा घेतली, जिल्हा स्तरावर सातत्यानं कार्यशाळा घेतल्या जातात, गरजू पत्रकारांना मदतीचा हात देण्याचे, कोरोना काळात पत्रकारांना मदतीचे अनेक उपक्रम जिल्हा संघानं राबविले आहेत. नियमित निवडणुका, चोख आर्थिक व्यवहार, नियमित बैठका घेऊन संघटन शक्ती वाढविण्याचं काम जिल्हा संघानं केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 90 टक्के पत्रकार जिल्हा संघाबरोबर जोडलेले आहेत.

एक आदर्श जिल्हा संघ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा संघाचे काम सुरू असल्याने परिषदेने सिंधुदुर्गची निवड केली आहे. या पुरस्काराबद्दल परिषदेचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र गजानन नाईक आणि जिल्हा संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.