‘नदीम-श्रवण’ फेम श्रवण राठोड कालवश

दोन दिवसांपासून होती प्रकृती गंभीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ‘चेहरा क्या देखते हो’, ‘ऐसी दिवानगी देखी नहीं कही’, ‘घुंगट की आड से’ यासारख्या नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकारद्वयी नदीम-श्रवण यांच्यापैकी श्रवण राठोड यांचे निधन झालं. कोरोनावरील उपचार सुरू असताना मुंबईतील रुग्णालयात गुरुवारी रात्री 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या रुग्णालयाचे दहा लाख रुपयांचं बिल थकल्यानं त्यांचं पार्थिव मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे.

हॉस्पिटलचे दहा लाखांचे बिल थकित

66 वर्षीय श्रवण राठोड हे कोरोना पॉझिटिव्ह होते. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवलं होतं. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसंच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. त्यांच्या मृत्यूचं कारण ऑर्गन फेल्युअर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ते उपचार घेत असलेल्या माहिममधील एसएल रहेजा रुग्णालयाचं सात दिवसांचं जवळपास 10 लाख रुपयांचं बिल थकित आहे. त्यामुळे श्रवण यांचा मृतदेह मिळण्यास विलंब होत आहे.

हेही वाचाः वेळीच रुग्णालयात दाखल व्हा, वैद्यकीय सुविधांची कमतरता नाही – मुख्यमंत्री

कुटुंबीयही कोरोना उपचारासाठी रुग्णालयात

बिल भरणंही गरजेचं आहे, मात्र श्रवण यांची दोन मुलं (संगीतकारद्वयी संजीव-दर्शन) आणि पत्नीही इतर रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल आहेत. श्रवण राठोड यांचं 10 लाख रुपयांचं इन्शुरन्स आहे. मात्र त्यांचे कुटुंबीयही कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं एसएल रहेजा हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि संबंधित विमा कंपनीसोबत बिलाच्या सेटलमेंटबाबत चर्चा सुरू आहे. फोनवरच ही बातचीत सुरू आहे.

हेही वाचाः कोविडचा घरातल्या कमावत्या माणसांवरच आघात!

राज्य सरकारकडे मदतीची मागणी

विम्याची रक्कम मिळाली तर रुग्णालयाचं थकित बिल भरलं जाणार आहे. त्यानंतरच श्रवण यांचं पार्थिव देण्यात येणार आहे. कोरोना काळात अनेक अडचणी असल्यानं श्रवण यांचे सुपुत्र संजीव श्रवण यांनी राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचाः मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या वादात जनतेचेच नुकसान : आप

९० च्या दशकातील हिट संगीतकार जोडी

१९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये नदीम- श्रवण या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!