रस्त्यावरुन चालता चालता हार्टअटॅक; तरुणाचा जागीच मृत्यू

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कमी वयातही तरुणांमध्ये हार्टअटॅक आणि मधुमेहासारखे आजार बळावत असल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत अनेक बातम्यांमध्ये तरुणांना हार्टअटॅक आल्याचं दिसून आलं आहे. अनेकांचा तर यात दुर्देवी मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत हार्टअटॅक हा वयाच्या एका टप्प्यानंतरच येत होता. मात्र बदलती जीवनशैली, कामाचे बदललेले स्वरुप, धकाधकीचं आयुष्य, अपुरी झोप आणि तणाव या सर्वांचा परिणाम आरोग्यावर होत असून त्याचे परिणामही दिसू लागले आहे. असाच एक व्हिडीओ उत्तर प्रदेशातील साहरनपूर येथून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. येथे एका तरुण व्यापाऱ्याचा हार्टफेल झाल्यामुळे मृत्यू झाला.

संपूर्ण घटना मार्केटमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

तरुणाचं नाव अमित असल्याचं सांगितलं जात आहे. तो रस्त्यावरून चालला होता आणि अचानक जमिनीवर कोसळला. त्याने छातीवर हात ठेवला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना मार्केटमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. तरुण व्यापाऱ्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे.

हिवाळ्यात रक्तदाबाच्या रुग्णांच्या आरोग्याच्या समस्या वाढतात

दरम्यान काही वृत्त संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात रक्तदाबाच्या रुग्णांच्या आरोग्याच्या समस्या वाढतात. यामुळं हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. रक्तदाबात सतत चढ-उतार होत असतील तर काही बाबी लक्षात ठेवा. तुमच्या लहान-सहान चुकांमुळं हा धोका वाढू शकतो. शिवाय, तुम्ही आधीच हृदयरोगी असाल, तर तुम्ही अजिबात निष्काळजी राहू नका.

काळजी घ्या!

हिवाळ्यात जास्त प्रवास टाळा. थंडीमुळं हृदयाच्या धमन्या आकसतात आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. यासाठी हृदयाला अधिक रक्तपुरवठा आवश्यक असतो. जर एखाद्याला आधीच हार्ट ब्लॉकेज असेल तर त्यामुळं हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. खूप थंडी असताना सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडू नका. विशेषतः सकाळी छातीत थंडी भरेल असं काही होऊ देऊ नका. हिवाळ्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तेव्हाच फिरायला जा. थंड पाण्याऐवजी कोमट पाण्यानं आंघोळ करा आणि आंघोळ करून लगेच घराबाहेर पडू नका.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!