संजय कांबळे स्मृति कबीर साहित्य पुरस्कार शोभा नाईक यांना जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी
कणकवली : ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सिंधुदुर्ग- शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा 2020-21चा कबीर पुरस्कार बेळगाव येथील मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका, कवयित्री, संशोधक, भाषांतरकार प्रा. डॉ. शोभा नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे.
दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्कार कोरोनानंतर बेळगाव येथे मराठीतील मान्यवर साहित्यिकाच्या हस्ते डॉ. नाईक यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
संजय कांबळे हे गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत विविध वृत्तपत्रात कार्यरत होते. ते परिवर्तन चळवळीतील सच्चे कार्यकर्ते होते. सावंतवाडी येथे भरलेल्या अ.भा विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांचे योगदान होते. त्यांच्या या आठवणी जागृत ठेवण्यासाठी कबीर पुरस्कार दरवर्षी त्यांच्या परिवारातर्फे मराठीतील आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या एका लेखक-कवीला किंवा सामाजिक कार्यकर्त्याला दिला जातो. गेल्या वर्षीचा कबीर पुरस्कार आजरा येथील धरणग्रस्त चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक संपत देसाई यांना देण्यात आला होता.
पुरस्कार विजेत्याला त्याच्या घरी किंवा त्याच्या गावी कबीर पुरस्कार प्रदान करून समारंभपूर्वक गौरविले जाते. प्रा. डॉ. शोभा नाईक या सध्या बेळगाव आरपीडी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून कविता, समीक्षा संशोधन आणि भाषांतरकार आदी प्रकारात त्या लेखन करतात.त्यांचे आजवर विविध लेखन प्रकारातील अनेक ग्रंथ प्रकाशित असून त्यांना कर्नाटक विद्यापीठाच्या कविवर्य विंदा करंदीकर साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्काराने तीन वेळा गौरविण्यात आले आहे. तर कर्नाटक शासनाच्या अकरावी बारावी मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत होत्या.