यालाच म्हणतात आदरपूर्वक लाज काढणं!

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्रातले मुरब्बी राजकारणी. कोणत्याही विषयावर गंभीरपणे व्यक्त होतानाच तिरकस शब्द पेरुन समोरच्याची फिरकी घेण्यात त्यांचा हातखंडा. यावेळी त्यांनी फिरकी घेतली ती गोवा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची. कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात पवारांनी कोश्यारींना शाब्दिक चिमटे काढलेत.
निमित्त होतं, महाराष्ट्राच्या राज्यपाल सचिवालयानं कोश्यारींच्या एक वर्षाच्या कारकिर्दीवर काढलेल्या कॉफी टेबल बुकचं. ‘जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी’ असं या चित्रमय पुस्तकाचं नाव असून राज्यपालांच्या कार्यालयाकडून त्याच्या प्रती राजकीय नेत्यांना पाठविण्यात आल्या. शरद पवार यांनी या पुस्तकाचं अवलोकन करून राज्यपाल कोश्यारीेंना पत्र लिहिलं आणि आपल्या मूळच्या पुणेरी बेरकी स्वभावाचा परिचय करून दिला.
‘जनराज्यपाल’ असं पदच नाही
पवारांनी पत्राच्या दुसर्याच ओळीत देशाच्या राज्यघटनेत ‘जनराज्यपाल’ नावाचं पदच नाही, असा उल्लेख करत चुकीवर बोट ठेवलं. त्याचबरोबर कोश्यारींची एक वर्षाची ‘मर्यादित’ कारकीर्द आणि ‘स्वप्रसिद्ध’ असं म्हणून या पुस्तकाच्या प्रकाशनामागच्या हेतूवरच निशाणा साधला.
पुस्तकात महत्त्वाचं असं आहे तरी काय?
या पुस्तकात राज्यपालांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीतल्या शपथविधी, दीक्षांत सोहळे, स्वागत समारंभ, गाठीभेटी, कार्यक्रम आणि त्यातला राज्यपालांचा सहभाग यावर आधारित छायाचित्रे आहेत. याचा उल्लेख करून राज्यपालांनी वर्षभरात नोंद घेण्याजोगी कसलीच कामगिरी केली नसल्याकडे पवारांनी अंगुलीनिर्देश केलाय.
‘त्या’ पत्रावरून साधला तीर
राज्यपाल कोश्यारींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपण अचानक ‘सेक्युलर’ कसे झालात, असा प्रश्न केला होता. त्यावर ठाकरेंनीही सडेतोड पत्र लिहून राज्यपालांची बोलती बंद केली होती. मात्र कॉफीटेबल बुकमध्ये या पत्रांचा उल्लेख नसल्याचे म्हणत पवारांनी कोश्यारींना खिंडीत गाठलंय.
‘ऐतिहासिक’ कारकीर्द…
कोश्यारींची कारकीर्द उण्यापुर्या एक वर्षाची. या काळात त्यांनी नोंद घेण्याजोगी विशेष कामगिरी केलेली नाही. तरीही त्यांच्या कार्याची भलामण करणारं कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं. या संदर्भात ‘ऐतिहासिक कारकीर्द’ असा उल्लेख करून पवारांनी राज्यपालांना लक्ष्य केलं.
हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं असून शरद पवारांचा शब्दसंग्रह कसा दांडगा आहे, यावर खमंग चर्चा रंगलीय.