‘माहीत नाही!’ मल्याच्या प्रत्यार्पण लांबण्वयावर केंद्राचं कोर्टात उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाचं सुप्रीम कोर्टात ''सरकारी'' उत्तर. दोन नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी.

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : बँकांना गंडवून देशाबाहेर फरार झालेला उद्योगपती तथा मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya) प्रत्यार्पण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर का होतोय, याची आपल्याकडे माहिती नाही, असं सरकारी उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं कोर्टात दिलं.

सोमवारच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर का होत आहे, याचं कारण विचारलं. त्यावर “फरार मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश युकेच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ब्रिटनमध्ये या प्रकरणावर नक्की काय गुप्त कार्यवाही सुरु आहे, ज्यामुळे प्रत्यार्पणाला उशीर होत आहे, याची आपल्याकडे माहिती नाही,” असं साचेबद्ध उत्तर केंद्र सरकारनं कोर्टाला दिलं.

विजय मल्ल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) नऊ हजार कोटी रुपयांना चुना लावून विदेशात फरार झाला होता.

दरम्यान, कोर्टानं मल्ल्याच्या वकिलांना विचारणा केली की, मल्ल्या केव्हा कोर्टासमोर हजर राहू शकतो. तसेच त्याच्याबाबत सुरु असलेली गोपनीय कार्यवाही कधी संपेल, याची माहिती त्यांनी दोन नोव्हेंबरपर्यंत सांगावी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!