मेस्सीच्या स्वप्नांना सौदीचा धक्का…

फिफा विश्वचषकाच्या सामन्यात अर्जेंटिनाचा २-१ने पराभव : अपराजित मालिका खंडित

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोहा : मंगळवारी फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेतील धक्कादायक निकाल पाहण्यास मिळाला. स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिनाला गट ‘क’च्या सामन्यात सौदी अरेबियाकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचाःऑफलाईन २९ दुकानांतून शंभर टक्के मालाची उचल…

अर्जेंटिनाने २०१९ नंतर पहिल्यांदाच सामना गमावला

मेस्सीच्या खात्यात अद्याप एकही विश्वचषक नाही आणि यावेळी तो हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे, पण कतारमध्ये खेळल्या जात असलेल्या विश्वचषकात तो आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. या विश्वचषकातील हा पहिलाच धक्कादायक निकाल आहे. मेस्सीने १०व्या मिनिटाला अर्जेंटिनाला आघाडीवर नेले असले तरी उत्तरार्धात सौदी अरेबियाने शानदार खेळ दाखवत बचावफळीत भेदक मारा करताना दोन गोल करत अर्जेंटिनाला पराभवास भाग पाडले. अर्जेंटिनाने पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण बरोबरीचा गोल करू शकला नाही आणि पराभव पत्करावा लागला. यासह सौदी अरेबियाने अर्जेंटिनाची ३६ सामन्यांची अपराजित राहण्याची मालिका मोडून काढली आणि प्रथमच विश्वचषकातील पहिला सामना जिंकला. अर्जेंटिनाने २०१९ नंतर पहिल्यांदाच सामना गमावला आहे.
हेही वाचाःगोवा डेअरीतील दहा कर्मचाऱ्यांना ‘नारळ’, उर्वरित १० जणांना…

असा मिळाला पेनल्टी

अर्जेंटिनाचा संघ आपल्या खेळाने सौदी अरेबियावर वर्चस्व गाजवताना दिसला. मेस्सीने दुसऱ्याच मिनिटाला चांगला प्रयत्न केला पण ओवेसने त्याचा बचाव केला. सहाव्या मिनिटाला मेस्सीनेही प्रयत्न केला पण यावेळीही ओवेस त्याच्या आणि गोलमध्ये आला. १०व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या अल बुलाहीने अर्जेंटिनाच्या बॉक्समध्ये फाऊल केले आणि रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. मेस्सीने ही पेनल्टी घेत त्याचे गोलमध्ये रूपांतर करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मात्र पूर्वार्धात दुसरा कोणताही गोल होऊ शकला नाही. अर्जेंटिना १-० ने आघाडीवर होता.
हेही वाचाः”शाळांना सध्या आहेत तीच नावे कायम ठेवा”…

उत्तरार्धात सामना उलटला

उत्तरार्धात सौदी अरेबियाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. यात ४८व्या मिनिटाला यश आले. त्यांच्यासाठी अल सेहरीने हा गोल केला. या गोलमध्ये त्याला फिरास अल ब्रिकानने साथ दिली. सेहरीला पास झालेल्या फेरासकडे चेंडू आला आणि त्याने चेंडू नेटमध्ये टाकून बरोबरी साधली. ५५व्या मिनिटाला सौदी अरेबियाने दुसरा गोल करत आघाडी घेतली. यावेळी गोलशीटवर सालेम अल डावसरीचे नाव दिसले. सलीमने उजव्या पायाने चेंडूला कट केले आणि कॉर्नरमध्ये चेंडू मारत गोल केला. येथे सौदी अरेबियाचा संघ २-१ असा पुढे गेला होता आणि त्यानंतर अर्जेंटिनाला पुनरागमन करता आले नाही. पूर्ण वेळेनंतर अतिरिक्त वेळेत अल्वारेझ एकदा गोल करण्याच्या जवळ आला पण अल अमिरीने चेंडू क्लिअर केला.
हेही वाचाःShraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात मोठा ट्विस्ट; आफताबच्या वकिलांनी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!