दारू म्हणून प्यायले सॅनिटायझर, पाचजणांचा मृत्यू

तिघे अत्यवस्थ, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : महाराष्ट्र सरकारनं कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवर निर्बंध घालण्यात आले. मात्र यामुळे तळीरामांची बरीच गैरसोय झाली. त्यातूनच एक भयंकर घटना घडलीय. दारूची तलफ आल्यानंतर काही जण सॅनिटायझर प्यायले. यात पाच जणांचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती गंभीर आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात ही घटना घडलीय. दारूचं व्यसन जडलेल्या काही जण तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले. यात पाच जणांचा मृत्यू झाला. पैकी तिघांचा घरीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. लॉकडाउनमुळे दारूची दुकानं बंद आहेत. त्यामुळे ते सॅनिटायझर प्यायले, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. या घटनेतील इतर तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांतून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं डबल म्युटेशन आढळून आलंय. त्यामुळे इथे प्रचंड प्रादूर्भाव झाला होता. त्यानंतर राज्यभरात विषाणूचं संक्रमण झालं. संसर्गाची साखळी तोंडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला. अनेक जिल्ह्यांमध्ये दारूविक्रीवरही बंधनं घालण्यात आली.

अल्कोहोलबाबतच्या गैरसमजातून…

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं, असं दारूड्यांच्या कानावर गेलं. त्यांनी अल्कोहोल म्हणजेच दारू असं गृहीत धरून दारूऐवजी सॅनिटायझर पिऊन टाकलं. पण त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. अशीच घटना यापूर्वी आंध्र प्रदेशमध्येही घडली होती. अल्कोहोलबाबतच्या गैरसमजातून असे प्रकार घडत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!