अखेर रिया चक्रवर्ती तुरुंगाबाहेर; हायकोर्टानं केली अटींवर सुटका

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) मुंबई हायकोर्टानं सशर्त जामीन मंजूर केलाय. मात्र रियाला तिचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिलेला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. रियाचा भाऊ शोविकला मात्र जामीन मिळालेला नाही.
रियाची १ लाखांच्या हमीवर सुटका केली आहे. तिच्यासह अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे (Sushant Singh Rajput) कर्मचारी सॅम्यूअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर झाला आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर असणाऱ्या रियाला एनसीबीने अटक केली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. मात्र कोर्टानं शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळला आहे.
रियानं सुटकेनंतर दर 10 दिवसांनी पोलिस स्थानकात हजेरी लावावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय प्रवास करू नये, अशा अटी घातल्या आहेत.
रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अखेर सत्याचा विजय झाला. आम्ही सादर केलेले पुरावे न्यायालयाने मान्य केले. सीबीआय, ईडी आणि एनसीबीने रियाचा पाठलाग करणं आता थांबवलं पाहिजे, असं ते म्हणाले.
8 सप्टेंबरला झाली होती अटक
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली 8 सप्टेंबरला अटक झाली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर एनसीबीनं रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं.
दीपेश सावंतचा कबुलीजबाब
28 ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकानं 10 दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केलं होतं. सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत यानं दिल्याचं एनसीबीनं न्यायालयाला सांगितलं होतं.