परिणाम शून्य म्हणून रेमडेसिव्हीर उपचारातून वगळलं- WHO

रेमडेसिव्हीरची मागणी महामारीत वाढली होती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होते. तर दुसरीकडे रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार पाहायला मिळाला. दरम्यान, आता रेमडेसिव्हीर हे उपचारातून वगळण्यात आलं. तसं WHOने निर्देशही दिले आहेत.

कोरोना महामारीत साधारण दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजारापर्यंत विकलं गेलं. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटकही केली. पण आता कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं स्पष्ट केलंय. त्यामुळे लवकरच आता कोविडच्या उपचारात रेमडेसिव्हीरचा वापर बंद केला जाणार आहे.

कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत, असंही WHOने म्हटलं आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती WHOने दिली आहे.

रॉयटर्सच्या पत्राला उत्तर

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं लिहिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना WHO च्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, होय आम्ही Prequalification list मधून रेमडेसिव्हीर वगळले आहे. WHO कडून हा त्या देशांसाठी संदेश आहे, जे WHOच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करतात. WHO आता त्या देशांना रेमडेसिव्हीर घेण्याची शिफारस करत नाही’. त्याचबरोबर WHO ने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीरचा वापर करु नका, असा इशारा दिलाय. कारण, गंभीर रुग्णांवरही रेमडेसिव्हीरचा कुठलाही परिणाम दिसून आल्याचे पुरावे नाहीत, असंही WHOने उत्तरात म्हटलंय.

रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार

कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या इंजेक्शनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु होता. दीड हजाराच्या आसपास किंमत असलेलं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत विकलं जात होतं.

रेमडेसिव्हीरच्या काळ्या बाजाराचे प्रकार अनेक राज्यात समोर आले होते. दरम्यान, कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर केला जाणार नसल्याचं आता WHO ने स्पष्ट केलंय. त्यामुळे यापूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिलेल्या रुग्णांकडून आता प्रश्न विचारले जाऊ शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!