महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. मूळचे विदर्भातील असणारे नाना पटोले यांचं नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत घेतलं जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. आक्रमक नेते म्हणून नाना पटोले ओळखले जातात.
काँग्रेस व्हाया भाजप
पटोलेंननी काँग्रेसमधूनच राजकारणाची सुरुवात केली होती. पण कालांतराने त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. २०१४मध्ये ते लोकसभा निवडणूक जिंकले होते. पण मोदींच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सडकून टीका केलेली. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिट्ठी दिलेली. विशेष म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला होता. त्यानंतर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांनी उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत विजयी झेंडा फडकावणाऱ्या नाना पटोलेंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीनामा?
मोठ्या चतुराईनं नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाची भूमिका पार पडली होती. सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र घेऊन त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलं. बुधवारी नाना पटोलेंनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाची दिल्लीत भेट घेतलेली. त्यानंतर नाना पटोलेंच्या बाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचं नाव निश्चित झालं असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
Maharashtra Assembly Speaker Nana Patole resigns from his post, hands over his resignation to Deputy Speaker Narhari Zirwal. pic.twitter.com/oXNL0Wyn5p
— ANI (@ANI) February 4, 2021