‘व्होकल फॉर लोकल’चा संकल्प लक्षात ठेवा!

स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : विजयादशमीचं पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एक प्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचंदेखील पर्व असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ‘मन की बात’ (Man Ki Baat) कार्यक्रमात सांगितलं. सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असं आवाहन त्यांनी केलंय.

जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारात कधी जायचं? काय खरेदी करायची? यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे, असं मोदी म्हणाले.

आपला विजय निश्चित!

करोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सर्व अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत, त्यात आपला विजय निश्चित आहे. पूर्वी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत होती. मात्र यंदा असे होऊ शकले नाही. पूर्वी दसऱ्याला मोठमोठ्या जत्रा भरत असत. मात्र यंदा त्यांचे स्वरूप देखील वेगळचे आहे. रामलीलाच्या उत्सवाचे देखील मोठे आकर्षण होते. मात्र त्यावर देखील काहीना काही निर्बंध आले आहेत.

संयमानेच वागायचंय!

पूर्वी नवरात्र काळात गुजरातच्या गरब्याचा आवाज सर्वत्र येत होता. मात्र यंदा मोठमोठाले कार्यक्रम बंद आहेत. पुढे आणखी उत्सव येणार आहेत. ईद, शरद पोर्णिमा, वाल्मिकी जयंती, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, गुरूनानक जयंती आदी उत्सव आहेत. मात्र, करोनाच्या या संकट काळात आपल्याला संयमानेच वागायचं आहे, मर्यादेतच राहायचं आहे. असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!