पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पहाटे देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून दिली याबाबतची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: उद्या सोमावारी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहाटे 6.30 वाजता देशावासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचाः 21 जूनपासून केंद्राकडून राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांना लसींचं वितरण

‘योग फॉर वेलनेस’

उद्या 21 जून रोजी आपण 7 वा योग दिवस साजरा करणार आहोत. ‘योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर या थीमचा भर आहे. उद्या सकाळी साडे सहा वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमाला मी संबोधित करणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं योग दिनानिमित्ताचं भाषण दूरदर्शन सहीत अन्य चॅनेल्सवर लाइव्ह दाखवलं जाणार आहे. यावेळी आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजूही संवाद साधणार आहेत. देशभरात योग दिनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम होणार असून त्यात अनेक मान्यवर भाग घेणार आहेत.

केवळ 20 लोकांना परवानगी

दरम्यान, कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन एका कार्यक्रम स्थळी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते 7.45 पर्यंत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लाल किल्ला परिसरात योग करणार आहेत. कोरोनामुळे यंदा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी संवाद साधल्यानंतर योगा केला जाणार आहे. लोकांनी घरीच राहून व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. योगा झाल्यानंतर आध्यात्मिक आणि योग गुरुही जनतेशी संवाद साधणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचाः शिवसेना उत्तर गोवा जिल्हा समितीतर्फे गिरी महामार्गावर वृक्षारोपण

मोदींच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय योग दिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2 हजार 700 पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना पटवून दिले जाणार आहे. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेट भाषण केलं होतं. त्यावेळी योग त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!