पंतप्रधान मोदी म्हणतात… जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं!

कोरोनाविरोधातली लढाई भारत सक्षमपणे लढत असल्याचा विश्वास

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाविरोधातली लढाई भारत सक्षमपणे लढत असल्याचा विश्वास व्यक्त केला. रुग्णसंख्या आता घटतेय. रुग्णवाढीचा दरही कमी झाला आहे. मृत्यूदरही कमी ठेवण्यात देशाच्या आरोग्य यंत्रणेला यश आलं असल्याचं मोदींनी देशाला संबोधित करताना म्हटलंय.

औषध येईपर्यंत हलगर्जीपण नको!

कोरोना हळूहळू नियंत्रणात येतो आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा घातक ठरु शकतो, असंही मोदींनी यावेळी बजावलं आहे. देशाला संबोधित करताना त्यांनी कोरोना वायरसचा पुन्हा भडका उडू शकतो, असा गंभीर इशाराही दिला. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मास्क वापरणं तर अनिवार्य आहेच. मात्र बेजबाबदारपणे वागल्यास कोरोना धोका पुन्हा उद्भवू शकतो, अशी भीती पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

पाहा व्हिडीओ

कोरोनावरचं औषध अजूनतरी आलेलं नाही. लस यायला अजून बराच अवकाश आहे. त्यामुळे औषण येईपर्यंत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि खबरदारी बाळगली पाहिजे, असं मोदींनी जनतेला संबोधित करताना म्हटलंय. लॉकडाऊन पुन्हा लावला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र म्हणून कुणीही गर्दी न करता, आपल्या कामकाजाच्या गोष्टी कराव्यात. अटी-शर्थींचं पालन करावं, असंही आवाहन त्यांनी केलं.

कोविड योद्ध्यांना सलाम

कोरोनाला नियंत्रणात आणण्यात कोविड योद्ध्यांचं योगदान मोठं असल्याचंही मोदींनी ठळकपणे नमूद केलंय. यावेळी नवरात्रौत्सव आणि दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरले नाही. आपल्या 15 मिनिटांच्या संबोधनात त्यांनी कोरोनाविरोधातील लढाईव्यतिरीक्त अन्या कोणत्याही विषयावर भाष्य केलं नाही.

राहुल गांधींचा टोला

भारत चीनमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण घडामोडींवर मोदींनी भाष्य करावं, असं ओपन चॅलेंज राहुल गांधी यांनी दिलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत चीन घडामोडींवर एकही शब्द बोलले नाही. ट्वीट आणि फेसबूक पोस्ट करत राहुल गांधी यांनी मोदींना कुरापती करणाऱ्या चीनला उत्तर देण्याचं आवाहन केलं होतं.

हेही वाचा

तीन महिन्यात पहिल्यांदाच 50 हजारपेक्षा कमी रुग्ण! रुग्णसंख्या घटल्यानं मोठा दिलासा

‘या’ महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार

आपची ताकद वाढली! बाणावली येथील नागरिकांचा आम आदमी पक्षात प्रवेश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!