जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ वन हेल्थ’चा नारा, व्हर्चुअली सहभाग

परिषदेत लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनमध्ये झालेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले.  यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदींनी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदींनी यावेळी ‘वन अर्थ वन हेल्थ’ चा मंत्र दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला.  

हेही वाचाः रॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा काँग्रेसकडून निषेध

सूत्रांनी सांगितलं की या बैठकीत फ्रांसचे राष्ट्रपती इमेनुएल मॅक्रो यांनी भारतासह अन्य देशांना कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करताना त्यात सूट देण्याची मागणी केली. त्यांनी कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरील बंदी हटवण्याचीही मागणी केली. लस बनवणाऱ्या देशांना कच्चा माल मिळायला हवा, असं ते म्हणाले.  

लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जी-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रिताच्या स्वरुपात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिलं होतं. जी-7 राष्ट्रांची यावर्षीची बैठक ही ब्रिटनमधील कॉर्नवल या ठिकाणी होत आहे. ब्रिटिश उच्चायुक्तालयाने आपल्या निवेदनात भारताला ‘जगाची फार्मसी’ अशी उपमा दिली होती. तसेच कोरोना लसीच्या निर्मीतीमध्ये भारताने केलेल्या प्रयत्नांचं कौतुकही करण्यात आलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, भारत जगातील 50 टक्क्यांहून जास्त लसींची निर्मीती करतोय. ब्रिटन आणि भारताने या कोरोनाच्या संकटाचा सामना एकत्रितपणे केला आहे.

हेही वाचाः राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच

2020 मध्ये कोरोनामुळं G7 बैठक रद्द

2020 मध्ये कोरोनामुळं G7 बैठक रद्द केली होती. भारताकडून पंतप्रधान मोदी यांच्या आधी मनमोहन सिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील G7 मध्ये सहभाग घेतला होता. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 मध्ये या परिषदेत सहभाग घेतला होता तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे 2005 ते 2009 असे सलग पाच वर्ष या परिषदेत सहभागी झाले होते.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!