PHOTO STORY | श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी, सजला विठुराया-रुक्मिणीमाई

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः आज श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचा गाभारा विविध आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसंच मंदिराच्या विविध भागांना झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडु, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. या सजावटीने विठुरायाचे आणि रुक्मिणी आईचं आजचं गोजिरं रुप अधिकच खुलून दिसत आहे.