अखेर परदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

भारतीय औषध महानियामक मंडळ (DCGI) कडून हिरवा कंदील

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय औषध महानियामक मंडळाने (DCGI) अखेर परदेशी लशींचा देशात वापर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मॉडर्ना आणि फायझर या लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी मान्यता दिलेल्या लशींची आयात करण्यासाठी आता ट्रायलची गरज नसेल, असं DCGI ने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः गोवा-सिंधुदुर्गात कामासाठी येणा-जाणाऱ्यांना टेस्ट बंधनकारकच !

परदेशी लसींचा भारतात येऊ शकतात

त्यामुळे आता अमेरिका, इंग्लंड आणि जपानमध्ये मान्यताप्राप्त लसी भारतात आणल्या जाऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही ट्रायलची गरज नसेल. यापूर्वी भारताने रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या वापराला मान्यता दिली होती. 15 जूननंतर या लसीच्या वापराला सुरुवात होणार आहे. याशिवाय, रशियाचीच स्पुटनिक लाईट ही लसही लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. या लसीची केवळ एक डोस पुरेसा असेल. डॉ. रेड्डीज कंपनीकडून भारतात या लसींची निर्मिती आणि वितरण करण्यात येणार आहे.

हेही वाचाः आरोग्य सेवकांसाठी केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल

जुलैपासून भारतात दिवसाला 1 कोटी लोकांना लस टोचणार?

आगामी काळात दिवसाला 1 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन आहे. कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर जुलै महिन्यापासून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात येईल. सिरमकडून जून महिन्यात भारताला 10 कोटी लसींचे डोस देण्यात येणार आहेत. तर भारत बायोटेककडूनही कोव्हॅक्सिन लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याशिवाय, स्पुटनिक व्ही या रशियन लसीच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे. अशाप्रकारे 30 ते 32 कोटी डोस उपलब्ध झाल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून केंद्र सरकारकडून नव्या लसीकरण योजनेचा प्रारंभ केला जाईल.

हेही वाचाः कोविडबाधित मुलांच्या उपचारात कोणतीच कसर ठेवणार नाही

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा अल्प वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 5 हजारांनी वाढ झाली आहे. मंगळवारी 1 लाख 32 हजार 788 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 207 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवारी देशात 2 लाख 31 हजार 456 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!