बापरे! पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर त्यांचे 22 तुकडे केले

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : बदलापूर सिनेमात घडल्याप्रमाणे एक भयंकर घटना समोर आली आहे. एकानं आपल्या पत्नी आणि अवघ्या सव्वा वर्षाच्या मुलीची हत्या केली. इतकंच नाही, तर हत्येनंतर त्यांच्या शरीराचे तब्बल 22 तुकडेही केले. मृत शरीराच्या तुकड्यांचा बंदोबस्त आरोपी करायला जात असतानाचा गावातल्या लोकांना संशय आला. लगेचच कानोकान पोलिसांना ही गोष्ट कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
नेमकी कुठे घडली घटना?
रिवा नावाचा एक तालुका मध्य प्रदेशात आहे. या तालुक्यातील एका छोटाशा गावात काळजाचा थराकाप उडवणारी ही घटना घडली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितावर पत्नी आणि मुलीची हत्या करुन त्यांच्या शरीराचे 22 तुकडे केल्याचा आरोप आहे. रिवा पोलिस मुख्यालायपासून 70 किलोमीटर दूर मऊगंज नावाच्या पोलिस हद्दीत रामनगर नावाचं गाव आहे. याच गावात ही खळबळजनक घडना घडली. संशयित आरोपीचं नाव छिंदलाल साकेत असल्याची माहिती मिळतेय. जिची हत्या आरोपीनं केली, ती त्याची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीनं आत्महत्या केल्यानंतर संशयित आरोपीनं आपल्याच वहिनीसोबत लग्न केलं होतं. यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. तिलाही आरोपीनं संपवलंय.
हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव प्रमिला असून मुलीचं नाव काजल आहे. प्रमिलाला आपल्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगा झाला होता. त्याने घडलेली हकीकत सांगितली. आरोपी छिंदलाल दोघांसोबत घरी आला होता. सोबत दारु आणि अंडी त्यानं आणली होती. खाणंपिणमं झाल्यानंतर सोबत आणलेल्या माणसाला छिंदलालने पळवून लावलं. त्यानंतरच छिंदलालने हे भयंकर कृत्य केल्याचा आरोप मुलानं केलाय. इंडिया टुडेने याबद्दलची माहिती दिली आहे.
कसा छडा लागला?
ही घटना 14-15 ऑक्टोबरच्या रात्री घडली असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीने पत्नी आणि मुलीचा खून केला. हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे एका बॅगमध्ये भरुन आरोपीने घराचं अंगण साफ केलं. कुणालाही काही कळू नये, म्हणून अंगण साफ करणाऱ्या आरोपीवर गावातल्या लोकांना संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतलं. धक्कादायक म्हणजे तुकडे केलेल्या शरीराचे तुकडे ज्या बॅगमध्ये आरोपीनं भरले होते, ती बॅग नष्ट करण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.