कोरोनाला झटक्यात बरं करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचा ‘या’ राज्यात बोलबाला

ICMR करणार आयुर्वेदिक औषधाची तपासणी; मुख्यमंत्र्यांकडून हे ‘चमत्कारी औषध’ चाचणीसाठी पाठवण्याचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सध्या देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलेलं आहे. यावर ‘अक्सिर इलाज’ अद्याप मिळालेला नाही. परंतु आंध्रातल्या आयुर्वेदिक औषधाने मात्र सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या औषधाने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनीही हे ‘चमत्कारी औषध’ चाचणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुर्वेदिक डॉक्टर बोनेगी आनंदय्या यांनी तयार केलं औषध

कोरोना रुग्णांना बरे करणारं हे औषध आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील किनारपट्टीतील कृष्णापट्टनम येथे आहे. येथील आयुर्वेदिक डॉक्टर बोनेगी आनंदय्या यांनी हे तयार केलं असून गुण असल्याने त्यांच्याकडे औषधासाठी तोबा गर्दी होत आहे. या औषधाने कोरोना बरा झाल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचाः युवकाच्या कानशिलात लावणाऱ्या सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन

औषध घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

राज्यातील सत्ताधारी वायएसआरसीपीचे आ. गोवर्धन रेड्डी हे स्वत: या आयुर्वेदिक औषधाचा सक्रियपणे प्रचार करत आहेत. त्यांनी या औषधाला कोरोनाचा चमत्कारिक इलाज म्हटलं आहे. कृष्णापट्टनम शहर गोवर्धन रेड्डी यांच्या मतदारसंघाचाच भाग आहे. या औषधाची माहिती जसजशी पसरत आहे, तसतसे दूरवरून लोक कृष्णापट्टनममध्ये हे औषध मिळवण्यासाठी पोहोचत आहेत. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात औषधांसाठी लांबच लांब रांग दिसून येते. कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेक रुग्णांनी हे औषध घेतलं आहे, त्यांची तब्येत बरीच सुधारली आहे आणि बरेही झाले आहेत. बोनिगी आनंदय्या हे आयुर्वेदातील प्रख्यात डॉक्टर असून त्यांनी 5 घटक एकत्रित करून कोरोनावरील औषध तयार केलं आहे. त्यांच्या या औषधाचा गुणही येत आहे. याच कारणामुळे त्यांच्या घरापुढे भलीमोठी रांग दिसून येते, असं आमदार गोवर्धन रेड्डी यांनी सांगितलंय.

गर्दी पाहून आंध्र प्रदेश सरकारही सक्रिय

भल्यामोठ्या गर्दीमुळे अनेक तज्ज्ञांनी, माजी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आणि म्हटलं की, ही गर्दी जमा झाल्याने विषाणूचा संसर्ग वेगाने वाढू शकतो. यामुळे स्थिती बिघडू शकते. यासोबतच कोणत्याही प्रमाणाशिवाय याला कोरोनावरील औषध म्हणण्यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. हे सर्व प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आणि गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आंध्र प्रदेश सरकारही खडबडून जागं झालं आहे. एका राज्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी येथील आमदारांना स्पष्ट सांगितलं आहे की, जोपर्यत वैद्यकीय तज्ज्ञ या औषधाची खातरजमा करत नाहीत, तोपर्यंत या औषधाचा प्रचार त्यांनी करू नये.

हेही वाचाः बिहारच्या बाप-लेकीची कमाल; कोरोना युद्धात डॉक्टरांच्या मदतीसाठी बनवला रोबोट

औषधाची चाचणी करण्यास ICMRचे पथकही पोहोचलं

कृष्णापट्टनम औषध किंवा कृष्णापट्टनम टॉनिक म्हणून प्रसिद्ध झालेलं हे औषध घेण्यासाठी डॉक्टर आनंदय्या यांच्या घराबाहेर लांबच लांब रांग आहे. सोशल मीडियावरून येणाऱ्या माहितीचा ओघ दिल्लीपर्यंत गेला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे नेल्लोर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी केंद्रीय आयुष मंत्री आणि आयसीएमआर संचालकांना या औषधांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तथापि, या औषधाच्या परीक्षणासाठी ICMRचे एक पथक याआधीच आंध्र प्रदेशात पोहाचलं आहे. यासोबतच नेल्लोर जिल्ह्यातील एसपींनी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे.

हेही वाचाः कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांचं कुटुंब-आश्रितांनाही मिळणार लस

83 वरचा ऑक्सिजन औषधाचे दोन थेंब टाकताच 95 वर

नेल्लोरचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व प्रमुख आयुर्वेदिक डॉक्टरांनी औषधाचे परीक्षण केल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील एका तज्ज्ञाने सांगितले की, आमच्यासमोर एका रुग्णाची ऑक्सिजन पातळी 83 होती. डोळ्यांत दोन थेंब टाकण्यात आल्यानंतर ती 95 पर्यंत वाढली. औषध घेतलेल्या एकाही रुग्णाने याबाबत तक्रार केलेली नाही. उलट आनंदय्या यांच्यामुळे जीव वाचल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर या औषधाचे निर्माते डॉ. आनंदय्या म्हणाले की, माझं औषध रुग्णांचा जीव वाचवतं. मी तीन प्रकारची औषधं देतो. कोरोना संसर्गच होऊ नये, झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढविणारे असे प्रकार आहेत. मी औषधासाठी एक रुपयाही घेणार नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!