पद्म पुरस्कार 2021; नामांकने दाखल करण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्लीः 2021 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने किंवा शिफारशी दाखल करण्याची सुरुवात 1 मे 2020 रोजी झाली होती. ही नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने आणि शिफारशी पद्म पुरस्कारांच्या https://padmaawards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन दाखल करता येतील.
हेही वाचाः कोरोनाबाबत मुद्दे प्रलंबित असल्यास एकत्रित खंडपीठात मांडा
पद्म पुरस्कारांचा इतिहास
पद्म पुरस्कारांमध्ये मुख्यत्वे पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असलेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. १९५४ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. अतिशय उत्तम कार्य केलेल्यांचा सन्मान करण्याचा या पुरस्कारांचा उद्देश आहे. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. समुदाय, व्यवसाय, पत किंवा लिंग याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. सार्वजनिक उपक्रमात डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता, सार्वजनिक उपक्रमांसह सरकारी कर्मचारी या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.
हेही वाचाः ‘या’ राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 21 जूनपर्यंत वाढला
पद्म पुरस्कारासाठी निवडप्रक्रिया
पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असं म्हणतात. मंत्रिमंडळ-सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) हे या समितीचे प्रमुख असून गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव चार ते सहा ख्यातनाम व्यक्ती समितीत सदस्य म्हणून समाविष्ट असतात. ही समिती आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावं निश्चित करते आणि ही नाव समितीद्वारे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.