वाहनधारकांनो लक्ष द्या, केंद्राचा मोठा निर्णय!

आता नाही मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स, RC, परमिटला मूदतवाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि गाड्यांच्या परमिटबाबत मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल), नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) सारख्या कागदपत्रांच्या वैधतेची मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. ही मुदत यापुढे वाढवली जाणार नाही. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही कागदपत्रांचे नूतनीकरण करायचे असेल तर तुमच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंतच वेळ आहे.

नूतनीकरण करण्यासाठी १७ दिवस शिल्लक

म्हणजेच, जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि वाहन परमिट या कागदपत्रांची वैधता संपुष्टात येत असेल, तर त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी १७ दिवस शिल्लक आहेत. या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम मुदत आधी ३१ ऑक्टोबर २०२१ अशी निश्चित करण्यात आली होती. जर तुम्ही ३१ ऑक्टोबर नंतर वाहन चालवताना या बेकायदेशीर कागदपत्रांसह पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

३१ ऑक्टोबर २०२१ नंतर कागदपत्रे अवैध

कोरोना महामारी दरम्यान, आरटीओ कार्यालयात गर्दी आणि कोविड -19 संसर्ग टाळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणात सरकारने शिथिलता दिली होती. पण आता सरकारने ही सूट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबरनंतर या कागदपत्रांमध्ये कोणतीही शिथिलता येणार नाही. जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता १ फेब्रुवारी २०२० पूर्वी संपली असेल तर ती आतापर्यंत वैध मानली जात होती. परंतु सरकारच्या ताज्या आदेशानंतर ३१ ऑक्टोबर २०२१ नंतर ते बेकायदेशीर मानले जातील.

८ वेळा दिली मूदतवाढ

करोना काळात ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट सारख्या कागदपत्रांची वैधता आतापर्यंत ८ वेळेस वाढवण्यात आली आहे. करोना महामारी दरम्यान, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९, संबंधित कागदपत्रांची वैधता पहिल्यांदा ३० मार्च २०२० पर्यंत वाढवली होती. त्यानंतर, तारीख ९ जून २०२० पर्यंत वाढवली, नंतर पुन्हा २४ ऑगस्ट २०२०, २७ डिसेंबर २०२०, २६ मार्च २०२१, १७ जून २०२१, ३० सप्टेंबर २०२१ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मूदतवाढ दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!