मुंबईत अनेक ठिकाणी वीज गुल

पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे टाटासह महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला फटका.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. ‘टाटा’कडून येणाऱ्या पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचं वृत्त आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे. पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

अदानी समूहानं ट्विटरवरुन या संदर्भात माहिती दिली आहे. ३८५ मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे अदानी समूहानं म्हटलं आहे.

उपनगरीय वाहतूक सेवेलाही फटका
मुंबईतील उपनगरीय वाहतूक सेवेलाही या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे. मुंबईतील जुहू, अंधेरी, मिरारोड, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील अनेक टिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ट्विटरवरही अनेकांनी आपल्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!