मुंबईत धुव्वाधार पावसात 3 दुर्घटना, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : मुसळधार पावसाने मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालंय. शुक्रवारपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा परिणाम मुंबईच्या वेगावर झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. लाईफलाईन समजली जाणारी मुंबईची लोकलसेवाही कोलमडली आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.

तीन दुर्घटना

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. तर मुंबईतील विक्रोळी येथे असललेल्या दुमजली इमारतीचा भाग कोसळलाय. आतापर्यंत या दुर्घटनेत 3 जणांचा बळी गेलाय. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. तर चेंबूरमध्ये भिंत कोसळल्याने 17 जणांचा बळी गेला आहे. एनडीआरएफची टीम याठिकाणी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भांडुपमध्ये अमरकोट शाळा परिसरात भिंत कोसळून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे, घराबाहेर साचलेल्या पाण्याचा निचरा करताना भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे.

मदतीची घोषणा

मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोष करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार नालासोपारा भागात पाणीच पाणी साचलं आहे.

सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता साडे दहा वाजले तरी पाणी ओसरण्याच नाव घेत नाही. रात्री अचानक पाणी साचलं, त्यामुळे कारखानदार, दुकानदार, तळ मजल्यावरील अनेक घरात अचानक पाणी आलं. त्यात सर्व जण झोपेत असल्याने समान वाचवण्यासाठी कुणालाही वेळच मिळाला नाही. मोठ्या प्रमाणात नागरीकांचं नुकसान झालं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!