सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांचं मोठं वक्तव्य

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
मुंबई : सुशांतसिंग राजपूतप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांची (Mumbai Police) प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने सुशांतने आत्महत्या केल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिहांनी हे वक्तव्य केलंय. माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्याचप्रमाणे एम्सने दिलेल्या रिपोर्टचं जराही आश्चर्य वाटलं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
उलटसुलट चर्चांना पूर्णविराम
एकूण सुशांत सिंहप्रकरणी (SushantSingRajputDeathCase) गेले काही दिवस राजकारण पेटलं होतं. उलटसुलट चर्चा आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सुशांतच्या मृत्युवरुन तर्क-वितर्क लढवले जात होते. अशातच मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षावरुन हे सर्व प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. त्यानंतर रोज सुशांतच्या मृत्यूप्रकरणी नवनवे खुलासे होत होते. दरम्यान, ड्रग्स कनेक्शनही समोर आल्यानं सुशांतप्रकरण एक वेगळ्याच वळणावर आलं. अखेर एम्सनं दिलेल्या अहवालावरुन सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचंच उघड झालं आहे.
#WATCH We are not at all surprised by this. It was the finding of the team of Cooper Hospital as well: Mumbai Police Commissioner Param Bir Singh on reports that AIIMS has stated it to be a case of suicide. #SushantSingRajputDeathCase pic.twitter.com/2L3MR9BsJW
— ANI (@ANI) October 5, 2020
माध्यमांनी बदनामी केली?
माध्यमांशी बोलताना परमबीर सिंहांनी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनंच सुरु होता, असं म्हटलंय. तसंच सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत समाधान व्यक्त केलंय. सुशांतच्या मृत्यूप्रकरणानंतर कुपर रुग्णालयाने सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. यारिपोर्टवरही संशयानं पाहिलं जात होतं. अखेर एम्स रुग्णालयानं दिलेल्या रिपोर्टवर अनेक चर्चांना पूर्णविराम लागलाय. तसंच माध्यमांनी केलेल्या मुंबई पोलिसांच्या बदनामीविरोधात निवृत्त आयपीएस कोर्टात गेल्यांचीही माहिती मुंबई पोलिस आयुक्तांनी दिली.
सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करुन मुंबई पोलिसांबाबत चुकीची माहिती पसरवली जात होती, असंही परमबीर सिंहांनी म्हटलं आहे. याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा मुंबई पोलिस आयुक्तांनी दिली आहे.