धक्कादायक! TRP रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग. पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली धक्कादायक माहिती.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला असून यात तीन टीव्ही चॅनल्सची नावं आली आहेत. अर्णब गोस्वामीच्या बहुचर्चित ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचंही यात नाव आहे. या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरू आहे, असं मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह (Param Bir Singh) यांनी सांगितलं. दरम्यान, रिपब्लिक चॅनेलनं निवेदन प्रसिद्ध केलं असून या प्रकरणात आपला कुठलाही हात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला आहे.

‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला, असं सिंह यांनी सांगितलं. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावलं जाईल, असं सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

दर महिन्याला दिले जायचे 400 ते 500 रुपये!
या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचं, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन अन्य चॅनलच्या मालकांनाही अटक करण्यात आली आहे. या रॅकेटअंतर्गत प्रत्येक घरात दर महिन्याला 400 ते 500 रुपये दिले जायचे, असं पोलिसांनी सांगितलं.

टीआरपी म्हणजे काय?
टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवलं जातं. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचं मोजमापही टीआरपीच्या आधारेच केलं जातं. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंगला महत्त्व आहे.

टीआरपी कसा मोजतात?
टीआरपी मोजण्यासाठी देशातील प्रत्येक शहरात पीपल्स मीटर किंवा बॅरोमीटर लावलेले असतात. याआधारे प्रेक्षकांचं ढोबळ सर्वेक्षण केलं जातं. यात काही हजार प्रेक्षकांना समाविष्ट करून घेतलं जातं. विशिष्ट ठिकाणी लावलेल्या पीपल्स मीटरवर नोंदवलेल्या माहितीवरून लोक टेलिव्हिजनवर सर्वाधिक वेळ कोणतं चॅनेल किंवा कार्यक्रम पाहत आहेत, याचा अंदाज घेतला जातो. या पीपल्स मीटरवर प्रत्येक मिनिटाला नोंदवलेली माहिती इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेझरमेंट संस्थेकडे पोहोचवली जाते. यानंतर या संस्थेकडून टीआरपी अहवाल प्रसिद्ध केला जातो.

चॅनेलच्या महसुलावर टीआरपीचा परिणाम…
जाहिरातदार एखाद्या चॅनेलला जाहिरात देताना टीआरपी रेटिंग बघतात. त्यामुळे जितका जास्त टीआरपी, तितक्या जास्त जाहिराती आणि तितकाच जास्त महसूल, असं समीकरण असतं. टीआरपी वाढवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यासाठी एखाद्या चॅनेलवर मनोरंजक गाण्याच्या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांना आमंत्रित केलं जातं. तर वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज आणि वादळी चर्चा आयोजित करुन जास्तीत जास्त टीआरपी मिळवला जातो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!