29 जणांकडून तिच्यावर होत होते 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार

डोंबिवलीतील घटना; 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना घेतलं ताब्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

डोंबिवली: साकीनाका घटनेनं राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे.

मुलीला ब्लॅकमेल करत 29 जणांकडून बलात्कार

या आरोपींमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला. या व्हिडीओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी  पोलिसांचा तपास सुरू असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याची पीडितेकडून तक्रार

डोंबीवलीत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तिच्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलीस हैराण झाले. जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला.

या व्हिडीओच्या आधारे पीडितेला धमकी देत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं. बदलापूर, रबाळे , मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला.

आतापर्यंत 23 जणांना घेतलं ताब्यात

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामधील दोन अल्पवयीन असल्याची देखील माहिती आहे. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत. दरम्यान पीडितेला उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची तब्येत स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!