औरंगाबादच्या तरुण उद्योजकाची अनोखी किमया; देशाला दिले 630 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्लांट

देशाला दिला 600 मेट्रिक टन ऑक्सिजन; हवेतून ऑक्सिजननिर्मिती करता येते यावर 8 वर्षांपूर्वी कुणीच ठेवला नाही विश्वास

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः हवेत ऑक्सिजन असतो तो आपण सर्वजण घेतो. मात्र, माणूस आजारी पडला तर त्याला थेट हवा देऊन चालत नाही, त्यावेळी मात्र कारखान्यात प्रक्रिया केलेलाच ऑक्सिजन द्यावा लागतो. हे तंत्र आत्मसात करून औरंगाबाद येथील तरुण उद्योजक संजय जैस्वाल यांनी 630 ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारले असून, त्याद्वारे सध्या 600 मेट्रिक टन वायुरूप ऑक्सिजन मिळत आहे. गेल्या 8 वर्षांत त्यांनी ही किमया साधली आहे.

वर्षभरातील उलाढाल 103 कोटी रुपये

पहिल्या वर्षात 30 लाखांची उलाढाल करणाऱ्या जैस्वाल यांनी वर्षभरात ही उलाढाल 103 कोटींवर नेऊन ठेवली आहे. प्राणवायूची किंमत काय असते, हे कोरोनाने अवघ्या जगाला दाखवून दिलं. दवाखान्याच्या छतावर ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारून तो स्वंयपूर्ण करून घ्या, असं आठ वर्षांपूर्वी संजय जैस्वाल देशभरातील दवाखान्यांत स्वत: जाऊन सांगत होते. ऑक्सिजन हवेतून फुकट मिळू शकतो, या तंत्रज्ञानावर कुणी त्यावेळी विश्वासच ठेवला नाही. त्यामुळे अनेक रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन प्लांट उभारून दिले. आता मात्र कोरोना महामारीत जैस्वाल यांना ऑक्सिजन प्लांटच्या इतक्या ऑर्डर मिळाल्या की, 30 लाखांची वार्षिक उलाढाल असलेली कंपनी आज 103 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. वर्षभरात तीन नवे कारखाने उभारूनही ऑर्डर पूर्ण करू शकत नाही, अशी अवस्था आहे.

…तर 600 मेट्रिक टनांचा तुटवडा जाणवला असता

एरॉक्स इंडस्ट्रीज लि. नावाने चिकलठाणा उद्योग वसाहतीत छोट्याशा जागेत सुरू झालेला जैस्वाल यांच्या उद्योजकतेचा प्रवास हा वर्षभरातच प्रचंड वेगाने विस्तारला. एकाच वर्षात त्यांना तीन नवे कारखाने उभारावे लागले. दुसरा प्रकल्प शेंद्रा, तर तिसरा प्रकल्प ऑरिक सिटीत उभारला जात आहे. देशात आज घडीला 720 मोठे ऑक्सिजन जनरेटर प्लांट कार्यरत आहेत. त्यापैकी 630 प्लांट एकट्या एरॉक्सने तयार केले आहेत. याद्वारे दररोज 600 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन हवेतून तयार होतो आहे. हे तंत्रज्ञान विकसित झालं नसतं, तर आज देशाला 600 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला असता.

पीएमओ कार्यालयाने दिली ऑर्डर

हवेतून ऑक्सिजन खेचून देवून तो तात्काळ रुग्णाला देण्याचं हे तंत्र अमेरिका, युरोप, जपान या देशांत आहे. त्याला देशी साज चढवत अस्सल भारतीय तंत्रज्ञानाचे ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प एरॉक्स कंपनी तयार करुन देते. 20 एलपीए (लिटर पर मिनीट) ते 4 हजार 400 एलपीएम कॉन्सट्रेटर ऑक्सिजन निर्मीती करणारी यंत्र एरॉक्स कंपनी तयार करुन देते. एका टन मध्ये शंभर सिलिंडर वायुरुप ऑक्सिजन तयार होतो. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळली तेव्हा तात्काळ पीएमओ कार्यालयाने जैस्वाल यांच्या कंपनीला 58 युनिटची ऑर्डर दिली. तेव्हा पासून देशाच्या कानाकोपऱ्यात या कंपनीच्या मशिन जात आहेत. त्यांनी देशातील सर्वच राज्यांना मशिन पुरवल्या आहेत. यात सर्वांत जास्त 125 सिस्टिम उत्तर प्रदेशला दिल्या. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 110 सिस्टिम दिल्या आहेत.

एरॉक्स इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक जय जैस्वाल सांगतात

मी मराठी माध्यमात शिकूनही केमिकल इंजिनिर होण्याचं स्वप्न पाहिलं. मुंबईत एमबीए केलं. काही वर्षं नोकरी करुन ऑक्सिजन प्लांट निर्मीतीचा व्यवसाय आठ वर्षापूर्वी सुरू केला तेव्हा लोकांना ही कल्पना पटली नाही. मी स्व-खर्चाने अनेक रुग्णालयात या सिस्टिम बसवून दिल्या. मला अस्खलित इंग्रजी भाषा येत नव्हती, ती जिद्दीने शिकलो. जगभर फिरुन स्वदेशी तंत्रज्ञानाने हे नवं तंत्रज्ञान विकसित केलं. मला देशसेवा करण्याची आवड होतीच ती या माध्यमातून पूर्ण होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!