कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवीर हिरावले

माजी भारतीय हॉकीपटू आणि प्रशिक्षक एमके कौशिक आणि माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंग यांचं निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोरोनामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरलीये. कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवीर हिरावलेत. माजी भारतीय हॉकीपटू आणि प्रशिक्षक एमके कौशिक यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. कौशिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या टीम इंडियाचे सदस्य होते. कौशिक यांना दिल्लीतील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. दुसऱ्या बाजूला मॉस्को येथे 1980 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारतीय संघाचे हॉकीपटू रविंदर पाल सिंग यांचंही शनिवारी सकाळी करोनामुळे निधन झालं. ते 60 वर्षांचे होते.  कौशिक आणि रविंदर पाल सिंग यांच्या मृत्यूमुळे हॉकीसह क्रीडाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

हेही वाचाः फ्रंटलाईन वर्कर्सच्या यादीत आता ‘या’ कर्मचाऱ्यांचा समावेश

हॉकीसाठी अमूल्य योगदान

कौशिक यांच्या पत्नींनाही कोरानाची बाधा झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कौशिक यांनी हॉकीसाठी अमूल्य योगदान दिलं होतं. ते 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठीचे हे अखेरचं पदक ठरलं. यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठी पदक मिळवता आलेलं नाही. कौशिक यांनी प्रशिक्षक पदाचीही जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. कौशिक यांनी टीम इंडियाच्या महिला आणि पुरुष संघाला हॉकीचे धडे दिले होते. कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 मध्ये भारतीय महिला हॉकी टीमने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कमाई केली होती.

एम.के.कौशिक

‘सेंटर-हाफ’ म्हणून नावलौकिक असलेला हॉकीपटू

रविंदर पाल सिंह यांना करोनाची लागण झाल्यामुळे २४ एप्रिलला रविंदर यांना लखनौ येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. करोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर रविंदर यांना गुरुवारी बिगरकोविड कक्षात स्थलांतरित करण्यात आलं. शुक्रवारी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आलं. पण शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पुतणी प्रज्ञा यादव यांनी दिली. पाल देखील 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते. 1979 ते 1984 या कालखंडात ‘सेंटर-हाफ’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

रवींदर पाल सिंग
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!