टि्वटरने केली हजारपेक्षा जास्त अकाउंट्स ब्लॉक

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या दबावानंतर अखेर टि्वटरने वादग्रस्त असलेली 97 टक्के अकाउंट्स ब्लॉक केली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवणारी अकाउंट्स ब्लॉक करण्याची मागणी केली होती. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘फार्मर जिनोसाइड’ (farmer genocide) या हॅशटॅगचा वापर केलेला मजकूर आणि खाती हटविण्याची मागणी टि्वटरकडे करण्यात आली होती.

लवकरच उर्वरित अकाउंट्सवरही कारवाई

केंद्र सरकारने टि्वटरला दोन वेळेस विनंती करुन 1,435 अकाउंट्स ब्लॉक करण्याची मागणी केली होती. त्यापैकी अखेर 1,398 अकाउंट्स टि्वटरने ब्लॉक केली. बुधवारी संध्याकाळी उशीरा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी आणि टि्वटर पब्लिक पॉलिसी उपाध्यक्ष मोनिक मेचे व जिम बेकर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर टि्वटरने सरकारने सांगितलेल्या अकाउंट्सविरोधात कारवाई करायला सुरुवात केली. लवकरच उर्वरित अकाउंट्सवरही कारवाई केली जाईल. त्याबाबतची टि्वटरची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

केंद्र सरकारने ज्या 1,178 अकाउंट्सचा पाकिस्तान आणि खलिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला होता त्यांना टि्वटरकडून ब्लॉक करण्यात आले आहे. तसेच ज्या 257 टि्वटर अकाउंट्सवरुन वादग्रस्त हॅशटॅग वापरण्या आला होता, त्यापैकी 220 अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.

कारवाई करण्यास दिला होता नकार…

यापूर्वी काही टि्वट आणि खात्यांवर निर्बंध लादण्याचे सरकारचे आदेश टि्वटरने पाळले नव्हते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत कंपनीने पत्रकार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या अकाउंटवर कारवाई करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्या टि्वटर अकाउंट्सवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. ‘कंपनीचे स्वत:चे नियम असतील, परंतु भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल. तसेच सरकारने सांगितलेल्या सर्व टि्वटर हँडलवर कारवाईही करावी लागेल,’ असे केंद्र सरकारनं टि्वटरसमोर स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अखेर आता कंपनीने 97 टक्के अकाउंट्स ब्लॉक केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!