देशभरात 50 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

यश सावर्डेकर | प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी करोनावर मात करणार्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासांमध्ये 74 हजार 893 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. याचबरोबर देशभरात करोनावर मात करणार्यांची संख्या आता 50 लाख 16 हजार 520 झाली आहे.
सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने 60 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 27 सप्टेंबरपर्यंत देशात 7 कोटी 19 लाख 67 हजार 230 नमुने तपासण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउनचे निर्बंध टप्प्याटप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहेत.
अनलॉक 5 अंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन नियम जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेसमोरील संकट अजून कायम असल्याचे म्हटले आहे.