चिथावणी दिल्यास सडेतोड प्रत्युत्तर!

Goan Varta Live | प्रतिनिधी
जैसलमेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करी जवानांसोबत यावर्षीही दिवाळी साजरी केली. राजस्थानातील जैसलमेर इथल्या लोंगेवाला छावणीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी यांनी लष्करी कुरापती काढणार्या पाकिस्तान आणि चीनला सज्जड दम दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसह दिवाळी साजरी करण्याची 2014 पासून सुरू केलेली परंपरा यावर्षीही पाळली. 1971मधील भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या जैसलमेर येथील लोंगेवाला छावणीत त्यांनी जवानांची भेट घेतली. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी केलेला गोळीबार आणि पूर्व लडाखमध्ये चीनशी सुरू असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न भाषणात केला.
भारताला चिथावणी दिल्यास सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा मोदी यांनी त्यांनी पाकिस्तान किंवा चीनचं नाव न घेता दिला. इतरांना समजून घेणं आणि समजावणं हे भारताचे धोरण आहे. पण जर कोणी आमची परीक्षा पाहिली आणि चिथावणीखोर कृती केली, तर चोख प्रत्युत्तर देऊ. देशाची क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आम्हाला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला.