केंद्राचा मोठा निर्णय! प्रवासी विमान वाहतूक 18 ऑक्टोबरपासून…!

८५ टक्के प्रवासी क्षमतेनं उड्डाण करता येणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशभरात नव्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच, देशात व्यापक प्रमाणावर लसीकरण होत असून त्याचा वेग देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात येण्याची चिन्ह निर्माण झालेली असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. असं असताना केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय येत्या १८ ऑक्टोबरपासून अर्थात सोमवारपासून देशभर लागू करण्यात येणार आहे.

८५ टक्के प्रवासी क्षमतेनं उड्डाण करता येणार

या वर्षी जुलै महिन्यात बऱ्याच कालावधीनंतर प्रवासी विमानवाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात आली होती. १ जुलै ते ५ जुलै दरम्यान देशातील विमान कंपन्यांना ५० टक्के क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्ट या जवळपास सव्वा महिन्यात प्रवाशांची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. पुढे १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीमध्ये ही मर्याता ७२.५ टक्के इतकी वाढवण्यात आली होती. तर १८ सप्टेंबरपासून या महिन्यात १८ ऑक्टोबरपर्यंत ही मर्यादा ८५ टक्के इतकी नेण्यात आली आहे. अर्थात, १८ ऑक्टोबरपर्यंत देशातील विमान कंपन्यांना ८५ टक्के प्रवासी क्षमतेनं उड्डाण करता येणार आहे.

मात्र, केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार, आता देशातील प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना पूर्ण १०० टक्के क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. १८ ऑक्टोबरपासून विमानांमधून पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक करात येणार आहे. ९ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार देशातील सर्व विमान कंपन्यांनी मिळून एकूण २ हजार ३४० आंतरदेशीय विमानांचं उड्डाण केलं. त्यांच्या एकूण क्षमतेच्या हे प्रमाण ७१.५ टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!