दुःखद! मिल्खा सिंह यांनी घेतला वयाच्या ९१व्या वर्षी अखेरचा श्वास

काही दिवसांपूर्वीच झालं होतं पत्नीचंही निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन झालं आहे. चंदिगडमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं कोरोनानं निधन झालं होतं. मिल्खा सिंह यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोनाची लागण झाल्यानंतर 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना चंदिगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यी प्रकृती अधिक ढासळसी. त्यानंतर डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यामध्ये यश आलं नाही.

कोरोना आणि पत्नीच्या निधनानं खचले!

मिल्खा सिंग यांना 20 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 3 जून रोजी त्यांना पीजीआयएमईआरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. 13 जून पर्यंत ते याठिकाणी दाखल होते.

त्यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. 13 जून रोजी कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या इतर काही समस्यांमुळं त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांच्या पथकानं अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना वाचवता आलं नाही.

पाच दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचंही कोरोनामुळं निधन झालंय.

फ्लाइंग शीख म्हणून ओळख

फ्लाइंग शीख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग हे भारताचे एकमेव असे धावपटू होते, ज्यांनी 400 मीटरच्या शर्यतीमध्ये आशियाई स्पर्धांसह राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही (कॉमनवेल्थ) सुवर्ण पदक जिंकलं होतं. 1958 च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी 200 मीटर आणि 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर 1962 च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.

1958 मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर (तेव्हाचे 440 यार्ड) शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली 1960 च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत 400 मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.

रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर शर्यत 45.73 सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या 100 व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे 40 वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.

भारतीय क्रीडा विश्वातील महान नावांपैकी एक असलेल्या मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबरोबरचा एक फोटो ट्विट केला आहे, त्यात त्यांनी मिल्खा सिंग हे असंख्य भारतीय चाहत्यांच्या मनात कायम राहतील असं म्हटलं आहे.

पंतप्रधानांनीही व्यक्त केलं दुःख

“श्री मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण एक महान क्रीडापटू गमावला आहे. असंख्य चाहत्यांच्या मनात त्यांच्यासाठी खास स्थान होतं. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वानं अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनानं मोठं दु:ख झालं”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!