टांगावाला ते मसाला किंग! असा होता निधन झालेल्या MDHच्या गुलाटींचा प्रवास

वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : दोन वर्षांपूर्वी ज्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती, त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आज (३ डिसेंबर) आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. एमडीएच मसालेचे धर्मपाल गुलाटी यांनी वयाच्या ९८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुलाटी यांनी मसाले क्षेत्रात भरीव काम केलंय. धर्मपाल गुलाटी यांचा २०१९मध्ये पद्मभूषण पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या करिअरची सुरुवात संघर्षमय होती. चला तर जाणून घेऊयात एमडीएच मसालेबद्दल!

एमडीएच मसाले जगभरात प्रसिद्ध आहे. पण एमडीएच म्हणजे काय हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. एमडीएक म्हणजे ‘महाशियां दी हट्टी’. याचा सरळ अर्थ होतो प्रतिष्ठित माणसाचं दुकान. धर्मपाल गुलाटी यांना प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्या दर्जेदार मसाल्यांनी. तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही, इतका एमडीएच हा ब्रॅण्ड मोठा आहे. आज धर्मपाल यांच्या निधनानं संपूर्ण एमडीएच कुटुंब शोकाकूल झालंय.

अनुभवाचा खजिना

धर्मपाल वयाच्या १५ व्या वर्षापासून व्यवसाय क्षेत्रात होते. त्यांचे वडील आरशांचा व्यवसाय करत असत. ही गोष्ट आहे १९३७ सालची. त्यांच्या वडलांनी वेगवेगळे व्यवसाय केले होते. साबण, कपडे आणि लाकडाचा व्यवसायही करून पाहिला होता. १९४७ उजाडेपर्यंत धर्मपाल यांनी प्रचंड व्यावयासिक अपयश पाहिलं होतं. वडलांच्या आलेल्या अपयाशाचा भरपूर अनुभव त्यांच्याकडे होता. फाळणीमुळे ते पाकिस्तानच्या सियालकोटमधून अमृतसरच्या विस्थापितांच्या शिबिरामध्ये पोहोचले. मग त्यांना दिल्लीत घर मिळालं. तिथं ना वीज होती ना पाणी आणि ना शौचालय. खिशात वडलांनी दिलेले फक्त १५०० रुपये होते. धर्मपाल यांनी ६५० रुपयात टांगा घेतला. २ आण्यात ते प्रवाशांना टांग्यामधून इच्छित स्थळी ये-जा करत असत. २०१६ साली याच सीईओ असणाऱ्या धर्मपाल यांनी जवळपास २१ कोटी रुपये वेतन घेतले, जे एमडीएचच्या वर्षाच्या २१३ कोटी रुपयांच्या १० टक्के इतकं होतं.

एमडीएचचा दुसरा नंबर

एमडीएचची ८० टक्के भागीदारी धर्मपाल यांच्याकडेच आहे. एमडीएचची सुरुवात दिल्लीच्या अजमल खान रोडवर छोट्याशा दुकानात झाली होती. ते साल होतं १९५९. गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. एकामागोमाग एक दुकानं ते थाटत गेले. थोड्या दिवसातच दिल्लीत त्यांनी मसाल्यांचा कारखाना सुरू केला. भारतीय मसाला बाजारात एमडीएच ही कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. तिची हिस्सेदारी जवळपास १२ टक्क्यांच्या आसपास आहे. क्रमांक एकवर एव्हरेस्ट मसाले आहे. एमडीएचचं १६०० कोटी रुपयांचे साम्राज्य असल्याची माहिती मिळते. आतापर्यंत हे साम्राज्य आणखी वाढलं असण्याचीही शक्यता जास्त आहे.

देशभरत एमडीएचचे २०१८ साली जवळपास १५ कारखाने होते. एक हजार डीलरच्या माध्यमातून त्यांची उत्पादनं घराघरात पोहोचतात. दुबई आणि लंडनमध्येही एमडीएचचं ऑफिस आहे. शंभरपेक्षा जास्त देशात त्यांचं उत्पादनं वितरित केलं जातं. एमडीएचकडे जवळपास ६२ उत्पादनं आहेत. जी १५० प्रकारच्या पॅकेजमध्ये मिळतात. कंपनीने काही चॅरिटेबल संस्था आणि रुग्णालये सुरू केली आहेत. तसंच 20 शाळाही सुरू केल्या आहेत, ज्यात गरिबांची मुलं शिक्षण घेतात. अर्थकारणासोबतच एमडीएच यांनी सामाजिक कार्यही केल्याचं आपल्याला यानिमित्तानं पाहायला मिळतं. २०१७साली त्यांनी आपल्या कमाईच्या ९० टक्के कमाई ही सामाजिक कार्यासाठी दान केली.

पाहा MDHची गाजलेली जाहिरात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!