मनोहर पर्रीकरांचं नाव देण्यात आलेली ‘ही’ मुंबईतली पहिलीच वास्तू

मुंबई महापालिकेच्या दवाखान्याला पर्रीकरांचं नाव

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचं नाव मुंबई महापालिकेच्या अंधेरी येथील दवाखान्याला देण्यात आलंय. अंधेरी कोलडोंगरी परिसरातील महापालिकेच्या दवाखान्याचा विस्तार करण्यात आला असून या ठिकाणी आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यात आलाय.

मुंबईतील अंधेरीच्या के-ईस्ट वॉर्डमधील महापालिकेच्या दवाखान्याला मनोहर पर्रीकरांचं नाव देण्यात आलंय. १७ मार्च रोजी या दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला असून पर्रीकर यांच्या नावे मुंबईत उभारण्यात येणारी ही पहिलीच वास्तू ठरली आहे.

कोलडोंगरी येथील प्रबोधनकार ठाकरे तरणतलावाजवळ पालिकेचा जुना आयुर्वेदिक दवाखाना आहे. दवाखान्यात रुग्णांची होणारी वाढती गर्दी आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या दवाखान्याचा विस्तार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. जुने आरोग्य केंद्र पाडून या ठिकाणी नवीन पाच मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला आणि दुसरा मजला आयुर्वेदिक दवाखाना, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर डायलिसीस सेंटर आणि पाचव्या मजल्यावर योगा आणि ऍक्युप्रेशर सेंटर बांधण्यात येणार आहे. या केंद्राचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती या केंद्रासाठी प्रयत्न करणारे येथील भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी दिली.

या दवाखान्याला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आलं असून तसा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला आहे. १७ मार्चला भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते हा नामकरण समारंभ पार पडला होता. यावेळी आमदार अतुल भातखळकर, अॅड. बाळ देसाई, दिलीप करंबेळकर, रवींद्र साठे, मिलिंद करमरकर यांनी पर्रीकरांच्या आठवणींना उजाळाही दिला.

पाहा या शुभारंभ सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!