महाराष्ट्र अनलॉक? तत्वतः निर्णय, अंशतः शिथिलता आणि शतशः गोंधळ

विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र सरकारची सारवासारव

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात जिल्ह्यांची ५ टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार अनलॉक करत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली होती. मात्र त्यांनंतर राज्याच्या आरोग्य खात्यानं तात्काळ सारवासारव केली असून अनलॉकच्या प्रक्रियेवरुन स्पष्टीकरण देत, असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे एकूणच सगळा संभ्रम वाढल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालंय.

महाराष्ट्राचं आरोग्य खातं काय म्हणतंय?

‘कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे नियंत्रणात आलेल नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. करोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट केलंय.

मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत!

‘ब्रेक द चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील’, असं देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

निर्णय अजून व्हायचाय!

‘टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल’, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

वडेट्टीवार काय म्हणाले होते?

गुरुवारी विजय वडेट्टीवारांनी राज्यातील जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी या आधारावर ५ गटांमध्ये विभागणी केल्याची घोषणा केली होती. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या आणि २५ टक्क्यांच्या खाली ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन पूर्णपणे उठवल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यासोबतच, या पाचही गटांमध्ये ताज्या आकडेवारीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याची यादी देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं होतं. पण, महाराष्ट्र सरकराने हा निर्णयच अजून अंतिम झालेला नसल्याचं जाहीर केल्यामुळे यावरून आता मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!