अंबाबाई मंदिरासह शिर्डीचं साईमंदिरही बंद! गोव्यातील धार्मिक स्थळांचं काय?

वाढत्या कोरोनामुळे मंदिरांकडून खबरदारीचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील सर्व मंदिरं भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. जोतिबाची चैत्र यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहो. त्याचप्रमाणेत अंबाबाईचा रथोत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी दिली आहे.

हेही वाचा – NAVDURGA | कुळाव्याच्या स्वप्नात आली मडकईची श्री नवदुर्गा देवी

राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली. त्यात सर्व जाती-धर्माची मंदिरे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, देवस्थान समितीकडे तसे निर्देश आलेले नसल्याने सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलंय.

कुणाला मिळणार प्रवेश?

सोमवारी दुपारी बैठकीनंतर त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार अंबाबाईसह समितीच्या अखत्यारितील सर्व ३ हजार ६४ मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले तसेच यंदाही २६ तारखेला होणारी जोतिबाची चैत्र यात्राही करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सवदेखील प्रतीकात्मकरित्या मंदिराच्या आवारात साजरा केला जाईल. सर्व मंदिरांचे सर्व धार्मिक विधी, पूजा, अर्चा नियमित सुरू राहतील. मात्र, पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षकवगळता अन्य कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केलंय. लोकमत डिजीटल टीमनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – पसंतीने केलेला विवाह कुणीही रोखू शकत नाही!

साईमंदिरही बंद

अंबाबाई मंदिराआधी शिर्डीतील साईमंदिरही ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही, तर ३० एप्रिलनंतरही मंदिर बंदच राहिल अशी माहिती शिर्डीचे स्थानिक पत्रकार गोविंद शेळके यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णवाढीचा दर कमी होताना दिसत नाही आहे.

महाराष्ट्रात 47 हजार 288 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 155 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 30 लाख 57 हजार 885 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 56 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावेळी राज्यात 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच राज्यात रविवारी एका दिवसांत 57 हजार 74 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होती. तर 222 रुग्णांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला होता.

हेही वाचा – भीषण! डिस्चार्ज घेऊन घरी चालले होते, पण वाटेतच काळानं घाव घातला

राज्यातही धार्मिक स्थळं बंद होणार?

दरम्यान, गोव्यातही मिनी लॉकडॉऊन करण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. सरकारनं खबरदारीची पावलं तातडीनं उचलायला हवीत अशी मागणी मगो आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातही कोरोना रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरतेय. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेत राज्यातील मंदिरांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार का, हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!