BIG BREAKING : उद्या रात्रीपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात बुधवार दि. 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आलंय. 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत हे कलम लागू असेल. कठोर निर्बंध घालत महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन जारी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना ही घोषणा केली. नाईलाजाने काही निर्बंध घालावे लागत आहेत. सर्वांचा जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळपासून आपण ‘ब्रेक द चेन’ लागू करत आहोत. राज्यात 144 कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाही.

अत्यावश्यक सेवांना मोकळीक

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केलेली नाही. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणार्‍या वर्गाला येण्या-जाण्यासाठी चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी, अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमधून होम डिलीव्हरी आणि टेक अवेलाच परवानगी असेल. तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचं लसीकरण बंधनकारक असेल, असं ठाकरे म्हणाले.

3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मोफत

राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत 7 कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत दिले जातील. शिवभोजन थाळी 10 रुपयांत सुरू केली होती. कोविड आल्यानंतर ती 5 रुपये केली. आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी या थाळीचा लाभ घेतला आहे. आता शिवभोजन थाळी पुढचा एक महिना मोफत दिली जाईल. दिवसाला आपण 2 लाख थाळ्या देत आहोत. गोरगरीबांसाठी हे शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. लॉकडाऊननंतर रोजीरोटीचं काय, अशी विचारणा केली जाते. रोजीचं नुकसान होईल, पण रोटीची सोय सरकारनं केली आहे, असं ठाकरे म्हणाले.

ब्रिटननं अडीच ते तीन महिने लॉकडाऊन लावून जवळपास 50 टक्के जनतेला लसीकरण केलं. आता तिथे रुग्णालयावरचा ताण कमी झाला आहे. मृत्यूदर कमी झाला आहे. त्याच मार्गानं आपल्याला जावं लागेल, लसीकरण वाढवावं लागेल. जेणेकरून पुढची लाट आपण थोपवू शकू. आपण एकदा कोविडवर नियंत्रण मिळवून दाखवलंय. पण यावेळी चित्र वेगळं आहे. आरोग्य सुविधा तोकडी पडताना आपल्याला दिसत आहे, असं ठाकरे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!