मराठी चित्रपटसृष्टीत ‘सन्नाटा’

अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : गोविंदाचा ‘जिस देश में गंगा रहता है…’ हा हिंदी चित्रपट पाहिला असेल, तर तुम्ही सन्नाटा हे पात्र विसरूच शकत नाही. हे पात्र वठवलं होतं मराठमोळे अभिनेते किशोर नांदलस्कर (Kishor Nandalaskar) यांनी. नांदलस्कर यांचं मंगळवारी कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ‘सन्नाटा’ पसरलाय.

किशोर नांदलस्कर यांनी अनेक नाटकं केली. मराठी आणि हिंदीत अनेक चित्रपट केले. त्यांना नेहमी छोटे रोलच मिळाले. मात्र मिळालेल्या अगदी लहानातल्या लहान भूमिकेतही त्यांनी जान ओतून त्या भूमिका जिवंत केल्या. ‘जिस देश में गंगा रहता है…’मधला ‘सन्नाटा’ हेही त्यापैकीच एक पात्र. किंबहुना नांदलस्कर हे त्यानंतर ‘सन्नाटा’ म्हणूनच अमराठी प्रेक्षकांत परिचित होते.

नांदलस्कर यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसलाय. त्यातलेच एक मराठी दिग्दर्शक विजू माने. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून नांदलस्कर यांना श्रद्धांजली वाहिलीय. विजू माने लिहितात…


”किशोर नांदलस्कर गेल्याची बातमी आली. क्षणभर निशब्द व्हायला झालं. मी २०१४ साली एक सिनेमा केला होता. ज्यात त्यांनी काम केलं होतं. अर्थात त्याआधी मी त्यांच्यासोबत एक व्यावसायीक नाटकसुध्दा केलं होतं. त्याच्याही अनेक आठवणी आहेत. पण ही आठवण विशेष रुखरुख लावणारी आहे.

त्या सिनेमात मी एक गाणं केलं होतं. ज्यात एका वृद्धाश्रमात एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस सुरु आहे. मला तेव्हा रमेश देव ह्यांनी निक्षून सांगितलं होतं की मला ह्या गाण्यावर नृत्य करायचंय. ते गाणं चित्रित होत असताना रमेश देव, सीमा देव, उदय सबनीस, विजू खोटे, स्वतः नांदलस्कर सगळी मंडळी नृत्य एन्जॉय करत होती. एका ब्रेक मध्ये किशोर नांदलस्कर मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले, “रमेश देवांच वय किती असेल रे ?” मी म्हटलं “असेल ८० वगैरे.” मग त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले,”मी ८० वर्षाचा होईन तेव्हा माझ्यासाठी असं एखादं गाणं करशील असं मला वचन दे” आणि त्यांचे ते भरून आलेले डोळे अजूनही आठवतायत. एका इतक्या भन्नाट कलाकाराची केवढीशी अपेक्षा होती…तेव्हा मी त्यांना वचन दिलं. पण पूर्ण करण्याची वेळच आली नाही …. सतत अचूक टायमिंगने सेटवरचं वातावरण हलकं फुलकं करणारी अशी निरागस व्यक्ती सोडून जाते तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं…सगळ्यांनी काळजी घ्या….”

किशोर नांदलस्कर यांचे काही चित्रपट, नाटकं, मालिका.

जिस देश में गंगा रेहता है, जाने भी दो यारो, झाले मोकळे आकाश (मालिका), सिंम्बा
येड्यांची जत्रा, सिंघम, सविता दामोदर परांजपे (मालिका), ‘नाना करते प्यार’ (नाटक), ‘विच्छा माझी पुरी करा’ (नाटक)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!