कर्नाटकच्या जलस्रोत मंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा सनसनाटी आरोप, व्हिडीओही समोर

कथित व्हिडीओमुळे जर्कीहोली चर्चेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

बेळगाव : पॉर्न कंटेट पाहत असल्याचा आरोप असणाऱ्या आमदाराचा वाद संपतो न संपतो तोच आता एका नवा वाद उफाळून आलाय. ठिकाण आहे कर्नाटक. कर्नाटकचे जलस्रोतमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण केले, अशी तक्रार मंगळवारी बंगळूर पोलिस आयुक्तांकडे दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनैतिक संबंधांची चित्रफीतही व्हायरल झाली असून, कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी सदर प्रकरणी पीडितेच्या बाजूने पोलिसांत धाव घेतली आहे. बंगळूर पोलिस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.

आरोपाचं कारण…?

तक्रारीत कलहळ्ळी यांनी म्हटले आहे की, सदर २५वर्षीय पीडित महिला प्रारंभी लघुपट बनवण्यासाठी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे गेली होती. त्यांनी कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात ‘केपीटीसीएल’मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. कालांतराने जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला नोकरी देण्यास नकार दिला. तदनंतर व्यथित तरुणीने दोघांमधील वैयक्तिक खासगी क्षण रेकॉर्ड केले. ही बाब समजल्यानंतर मंत्री जारकीहोळी यांनी तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

तरुणीच्या कुटुंबीयांनी कलहळ्ळी यांच्याकडे याविषयी माहिती दिल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सदर प्रकरण संवेदनशील असून, गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशी करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. रात्री उशिरा चौकशी सत्र सुरू झाले होते.

राजकीय अस्तित्त्व धोक्यात

जलस्रोतमंत्री रमेश जारकीहोळी हे कर्नाटकातील मोठे प्रस्थ मानले जाते. यापूर्वी काँग्रेसचे नेते असलेल्या जारकीहोळी यांचा कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा आहे. परंतु, आता कथित चित्रफितीमुळे कर्नाटकातील विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

तर फाशी द्या

व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ चित्रफितीची चौकशी होऊ द्या. त्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे. मी दोषी असेन तर मला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे.

कोण आहे जर्कीहोली?

रमेश जारकिहोळी हे भाजपचे बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री आहेत. कर्नाटक राज्यात त्यांचे मोठे नाव आहे. ते पूर्वी काँग्रेस पक्षाचेही नेते होते. कर्नाटकात भाजपची सत्ता येण्यात रमेश जारकीहोळी यांचा मोठा वाटा आहे.

हेही वाचा –

सभागृहात बसून पॉर्न कंटेट स्क्रोल करताना राजकीय नेता कॅमेऱ्यात कैद

पांडेवर गुन्हा… सोमणचं कौतुक, असं कसं? दिग्दर्शकाच्या ट्वीटनं नवी चर्चा

‘काणकोण धरणावरील अश्लिल व्हिडीयोतून सिद्ध झालं भाजपा पोर्न माफियाला प्रोत्साहन देतंय’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!