कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्याची माहिती मिळाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कपिल देव यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्यरात्री 1 वाजता कपिल देव साऊथ दिल्लीमधील ओखला भागात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात छातीत दुखत असल्यामुळे तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांच्यावर रात्रीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली.

संन्यासानंतर समालोचन

61 वर्षीय कपिल देव अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचनही करत असतात. आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कपिल देव यांनी 131 कसोटी आणि 225 वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या काळातले सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळख असलेल्या कपिल देव यांचा भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा उचलला होता.

सर्वोत्तम अष्टपैलू

कसोटी कारकिर्दीत 5 हजार 248 धावा आणि 434 बळी, वन-डे क्रिकेटमध्ये 3 हजार 783 धावा आणि 253 बळी अशी बहारदार कामगिरी कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत केली. 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांनी नाबाद 175 धावा करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता.

अनेक भारतीय-विदेशी क्रिकेटपटूंसह जगभरातील चाहत्यांनी कपिल देव यांच्या प्रकृतीसाठी शुभकामना व्यक्त केल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!