माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Jaswant Singh) यांचं निधन झालं. गेल्या सहा वर्षांपासून ते कोमामध्ये होते. ते 82 वर्षांचे होते.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी 1999 ते 2004 च्या दरम्यान संरक्षण, विदेश आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळला. 2014 मध्ये भाजपनं सिंह यांना बाडमेर मंतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं होतं. त्यावेळी नाराज झालेल्या जसवंत सिंह यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत अपक्ष निवडणुक लढले. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्याचवर्षी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली . त्यामुळं ते सहा वर्ष कोमामध्ये होते.
भारतीय लष्करात असलेल्या जसवंत सिंह यांनी नंतर राजकारणात पाऊल टाकले. भाजपची स्थापना करणाऱ्या नेत्यांमध्ये जसवंत सिंह यांचाही सहभाग होता. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी भाजपचं प्रतिनिधित्व केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ‘अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्द्यांची जगभरात छाप सोडली, त्यांच्या निधनानं दुःखी आहे.’, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.