जर्मनीला जपानचा तडाखा…

फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या जर्मनीला जपानने २-१ ने केले पराभूत

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोहा : फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनानंतर आता जर्मनीला ग्रुप स्टेजमध्ये मोठा धक्का बसला. चार वेळा फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या जर्मनीला जपानने २-१ असे पराभूत केले. जर्मनीने पहिल्या हाफमध्ये दादा संघासारखा खेळ करत जपानवर १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये जपानने झुंजार खेळी करत जर्मनीचे आव्हान परतवून लागवले. जपानकडून रिट्सू डोआनने ७५ व्या मिनिटाला तर ताकुमा असानोने ८५ व्या मिनिटाला गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचाःसरकारी नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा…

पहिल्या हाफमध्ये जर्मनी सुसाट

जपानविरुद्धच्या पहिल्या हाफमध्ये बलाढ्य जर्मनी एकदम सुसाट होती. जर्मनीच्या गुंडोगनने ३३व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. त्याला जपानच्या गोलकिपर गोंडाच्या चुकीमुळे पेनाल्टी मिळाली त्याचे गुंडोगनने गोलमध्ये रूपांतर करण्यात कोणतीही चूक केली नाही. फक्त पहिल्या हाफची चर्चा करायची झाली तर जर्मनीने जपानच्या गोलपोस्टवर १५ वेळा आक्रमक चाली रचल्या. त्यातील ६ शॉट्स हे त्यांचे ऑन टार्गेट होते. दुसरीकडे बचावात्मक मोडमध्ये असलेल्या जपानला एकदाही जर्मनीच्या गोलपोस्टवर आक्रमण करता आले नाही. बॉलचा ताबा आणि पासिंग या दोन्ही बाबतीत जर्मनी जपानच्या खूप पुढे होती.
हेही वाचाःआर्थिक फसवणूक प्रकरणात संशयित पती पत्नीच्या जामिनावर आज सुनावणी…

दुसऱ्या हाफमध्ये जपानचे झुंजार पुनरागमन

पहिल्या हाफमध्ये जर्मनीचा धडाका पाहून हा सामना जर्मनी सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये जपानने झुंजार खेळी करत जर्मनीच्या गोलपोस्टवर आक्रमक चाली रचल्या. त्यांनी १२ पैकी ४ शॉट्स अचूक गोलपोस्टच्या दिशेने मारले. त्यातील दोन शॉट्सवर गोल करण्यात जपानला यश आले. जपानकडून पहिला गोल हा रिट्सूने ७५व्या मिनिटाला केला. जपानने बरोबरी साधत जर्मनीचे आक्रमण देखील रोखण्यात यश मिळवले. त्यांच्या बचाव फळीने जर्मनीचे ९ शॉट्स परतवून लावले. दरम्यान, हा सामना १-१ अशा बरोबरीत राहील असे वाटत असतानाच ताकूमा असानोने ८३व्या मिनिटाला जपानचा दुसरा गोल करत जर्मनीला मोठा धक्का दिला. यानंतर जर्मनीने इंज्यूरी टाईमपर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जपानने त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला.
हेही वाचाःमडगावात कदंब बसचा अपघात, दोन गाड्यांचे नुकसान…

जर्मनी संकटात?

२०१८ साली पहिल्याच समान्यात झालेल्या पराभवामुळे जर्मनीचे आव्हान साखळी फेरीतच समाप्त झाले होते. यंदाही जर्मनीसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. जर्मनीच्या गटात स्पेन आणि कॉस्टा रिका हे अन्य दोन संघ आहेत. त्यात आता स्पेनचे कडवे आव्हान परतवून लावणे जर्मनीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा यंदाही जर्मनीला पहिल्याच फेरीतून बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःमिरामार चोरी प्रकरणी संशयिताला अटक; माल जप्त…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!