चिकनमुळे ब्लॅक फंगस पसरतोय का?

जाणून घ्या या दाव्यामागील सत्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसने सर्वांची चिंता वाढवली आहे. यालाच काळी बुरशी असेही म्हणतात. या काळ्या बुरशीचे रुग्ण गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाप्रमाणेच आता ही काळी बुरशी नेमकी कशापासून होते, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. सोशल मीडियावर याबाबत नाना प्रकारचे अंदाज वर्तवून संबंधित माहिती मोठ्या प्रमाणावर शेअरसुद्धा केली जात आहे. यातील बहुतांश माहिती दिशाभूल करणारी आहे. याचदरम्यान एक माहिती सोशल मीडियात शेअर केली जात आहे ती चिकन फार्मशी संबंधित आहे. चिकन फार्ममुळे ब्लॅक फंगस पसरत असल्याची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. पंजाब सरकारने पॉल्ट्री फॉर्मला ‘इंफेक्टेड एरिया’ घोषित केलं आहे. त्यानंतर पीआयबी फॅक्ट चेक टीमने तपासणी केली आणि या पोस्टच्या सत्यतेचा उलगडा केला.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ

सोशल मीडियात काय दावा केला जात आहे?

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की ब्लॅक फंगस हा जिवघेणा आजार चिकनमुळे फैलावत चालला आहे. पंजाब सरकारने पॉल्ट्री फार्मला ‘इंफेक्टेड एरिया’ घोषित केले आहे. त्यामुळे पॉल्ट्री फॉर्ममधील चिकन खाऊ नका. चिकन खाणे टाळून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.

हेही वाचाः कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात खासगी रुग्णालयांचे दर निश्चित

दाव्यातील सत्यता काय आहे?

सोशल मीडियात पॉल्ट्री फार्मशी संबंधित करण्यात आलेल्या दाव्याची पीआयबी फॅक्ट चेक टीमने पडताळणी केली. याच पडताळणीतून हे उघड झाले आहे की ब्लॅक फंगसशी पॉल्ट्री फार्मचा संबंध जोडणे चुकीचा आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर म्हटलं आहे की, चिकनमधून मनुष्यापर्यंत संसर्ग पसरल्याच्या दाव्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे सोशल मीडियात कुठलाही दावा केला गेला असेल तर आधी त्या दाव्याची सत्यता तपासा आणि नंतरच त्यावर विश्वास ठेवा.

काय आहे ब्लॅक फंगस?

ब्लॅक फंगस हे अत्यंत गंभीर इंफेक्शन आहे. हा संसर्ग म्यूकोर्मिसेट्स नावाच्या फंगलच्या समूहापासून होतो. विशेष म्हणजे हे फंगस पर्यावरणात आधीपासूनच असतात. नंतर आपल्या शरिरात गेल्यानंतर फुफ्फुस आणि श्वसनयंत्रणेवर परिणाम करतात. तसंच माती, शिळी भाकरी किंवा शिळे जेवण यांच्या माध्यमातून फंगस आपल्या श्वासावाटे शरिरात शिरकाव करतात. ब्लॅक फंगसमुळे नाकावर काळेपणा येतो, तसंच छातीत वेदना, श्वास घेण्यात त्रास, खोकल्यातून रक्त वाहणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. सध्या स्टेरॉइडच्या ज्यादा वापरामुळे इन्फेक्शन होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!