राष्ट्रकुलमध्ये भारताचा सुवर्ण पंच…

पाचव्या दिवशी भारताने पटकावली २ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदके

Goan Varta Live | प्रतिनिधी

बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिवसेंदिवस भारताची उत्तमोत्तम कामगिरी सुरू आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताला दोन सुवर्णपदकांची कमाई करता आली. यामध्ये भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. त्यापूर्वी लॉन बॉल खेळामध्ये भारतीय महिला लॉन बॉल संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावत पाचव्या दिवशी ११ पदकांची कमाई केली आणि इंग्लंडमध्ये तिरंगा फडकावला.
हेही वाचा:डिचोलीतील उमेदवारांचा वैयक्तिक संपर्कावर भर…

५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता ११ झाली असून ज्यामध्ये ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यापैकी वेटलिंफ्टिंगमध्ये भारताच्या नावावर एकूण सात पदकांची नोंद झाली आहे. तर, महिला ज्युदोपटू सुशीला देवी लिकमाबाम हिने रौप्य, तर विजय कुमार यादवने कांस्य पदकाची कमाई केली आहे.
हेही वाचा:’या’ पंचायतीची निवडणूक भाजप, काँग्रेस नेत्यांसाठी प्रतिष्ठेची…

टेबल टेनिसमध्ये सिंगापूरचा धुव्वा

भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने मंगळवारी अंतिम सामन्यात सिंगापूरचा ३-१ असा पराभव केला. भारताकडून दुहेरी सामन्यात हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी विजयाची नोंद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. साथियान आणि हरमीत देसाई यांनी आपापले वैयक्तिक सामने जिंकून भारताचे सुवर्णपदक निश्चित केले. पुरुषांच्या टेबल टेनिसमधील सांघिक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले होते.
हेही वाचा:मोरजीत विविध प्रभागांत नातेवाईक आमने - सामने…

लॉन बॉलमध्ये ऐतिहासिक कामगिरी

लॉन बॉलमध्ये भारताच्या महिला संघाने देशाच्या पदतालिकेत आणखी एका सुवर्ण पदकाची नोंद केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७ विरुद्ध १० असा पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला. याआधी उपांत्य फेरीमध्ये झालेल्या निकराच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभव करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अखेर मंगळवारी (दि. २) भारताच्या जिगबाज महिला संघाने लॉन बॉल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
हेही वाचा:तळीरामांना वाहतूक पोलिसांचा दणका ; 28 जणांवर कारवाई…

वेटलिफ्टिंग : विकास ठाकूरला रौप्य

भारतीय वेटलिफ्टर्सची राष्ट्रकुल २०२२ मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता वेटलिफ्टर विजय ठाकूर याने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्यपदक भारताला मिळवून दिले आहे. विकासने प्रथम स्नॅच प्रकारात १५५ किलो वजन उचलल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात १८७ किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात १९१ किलो वजन उचलले. अशारितीने विकासने एकूण (१५५+१९१) ३४६ किलोग्राम वजन उचलत एक दमदार अशी कामगिरी करत भारताला रौप्यपदक जिंकवून दिले.
हेही वाचा:लॉकडाऊनमध्येही पर्यटन खात्याने केले कोट्यवधी खर्च…

भारताची पदकसंख्या ११वर

मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी वैयक्तिक तर लॉन बॉल आणि टेबल टेनिसमध्ये भारताने सांघिक सुवर्णपदक जिंकले असून संकेत सरगर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्यपदक मिळवले आहे. तसेच गुरुराजा पुजारी याने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवले असून विजयकुमारनेही कांस्यपदक प्राप्त केले आहे. तर वेटलिफ्टर हरजिंदर कौरने मिळवलेल्या कांस्यपदकामुळे भारताची पदकसंख्या ११वर पोहोचली आहे.
हेही वाचा:मावळींगे कुडचिरे पंचायतीतून ८२ वर्षीय उमेदवार रिंगणात…

भारोत्तोलक पूनम यादव अपयशी

भारतीय भारोत्तोलक पूनम यादव मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्लीन अ‍ॅण्ड जर्कमधील तीनही प्रयत्नांत अपयशी ठरली. त्यामुळे महिलांच्या ७६ किलो वजनी गटात ती शेवटच्या स्थानावर राहिली. ६९ किलो वजनी गटातील विद्यमान राष्ट्रकुल विजेती पूनम स्नॅचनंतर रौप्यपदक जिंकण्याच्या स्थितीत होती. स्नॅचमध्ये तिने तिसऱ्या प्रयत्नात ९८ किलो वजन उचलले. मात्र, क्लीन अ‍ॅण्ड जर्क पूनमसाठी मोठे अडसर ठरले. ती तीनही प्रयत्नांमध्ये ११६ किलो वजन उचलू शकली नाही. पूनमने तिच्या अंतिम प्रयत्नानंतर पंचांकडे दाद मागितली, परंतु ते फेटाळण्यात आले आणि तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले
हेही वाचा:सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला छोटूचा जामीन…

अँथलीट धनलक्ष्मी ३ वर्षांसाठी निलंबित

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू कमालीची कामगिरी करत असतानाच, एक झटका लागला आहे. भारताची एथलीट धनलक्ष्मी सेकरला ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. डोप टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर तिला ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. वाडा २०२२ यादीतील प्रतिबंधित मेटांडियनोन चाचणीमध्ये ती पॉझिटिव्ह आढळली. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये धनलक्ष्मीकडून संपूर्ण देशाला अपेक्षा होती. पण, सामना सुरू होण्याआधीच ती डोपिंगमध्ये फसली. यामुळे भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. ती बाहेर गेल्यामुळे संघही कमकुवत झाला आहे. धनलक्ष्मी ४×१०० मीटर रिले टीमची सदस्य होती.
हेही वाचा:उच्च माध्यमिक शाळांनी दत्तक घ्यावी अंगणवाडी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!