सुनील छेत्रीने मोडला लिओनेल मेस्सीचा रेकॉर्ड

सर्वाधिक गोल करणारा बनला दुसरा सक्रिय फुटबॉलर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः 2022 FIFA वर्ल्ड कप आणि 2023 एएफसी आशियाई चषक संयुक्त क्वालिफायरमध्ये बांग्लादेशविरूद्ध सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या सुशोभित कारकीर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला. सुनील फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीच्या पुढे जात सर्वाधिक गोल करणारा दुसरा सक्रिय फुटबॉलपटू बनला आहे. छेत्रीने 117 सामन्यांतून 74 गोल केले आहेत.

79व्या मिनिटाला पहिला गोल    

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सुनील छेत्रीने 79व्या मिनिटाला पहिला गोल करत भारतीय संघाचं खातं उघडलं. त्यानंतर अखेरच्या काही मिनिटात (90+2) सुनीलने आणखी गोल करत भारताचा ग्रुप-ई मधील या सामन्यातील विजय निश्चित केला. या दोन गोलसह 36 वर्षीय सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलची संख्या 74 इतकी केली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डो नंतर सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये छेत्रीचा क्रमांक लागतो. रोनाल्डोने 103 गोल केले आहेत.

टॉप- 10मध्ये येण्यासाठी एक गोल हवा

फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या 10 मध्ये येण्यासाठी सुनील छेत्रीला फक्त एका गोलची गरज आहे. या यादीत तो सध्या 11व्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे 10व्या क्रमांकावर तीन खेळाडू आहेत. यात हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटो आणि कुवेतचा बशर अब्दुल्लाह हे खेळाडू आहेत. या सर्वांनी प्रत्येकी 75 गोल केले आहेत. सुनील छेत्रीच्या मागे असलेले युएईच्या अलीने गेल्या आठवड्यात मलेशियाविरुद्ध 73वा गोल केला होता. तर मेसीने चिली विरुद्ध 72वा गोल केला.

स्पर्धेतील भारताचा पहिला विजय

याआधी तीन जून रोजी झालेल्या सामन्यात कतार विरुद्ध भारताचा 0-1 असा पराभव झाला होता. पण त्यानंतर बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने जोरदार कमबॅक केले. आता भारताची पुढील लढत 15 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. बांगलादेशने अखेरच्या काही मिनिटात बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. भारत 2022च्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!