सलग दुसऱ्या दिवशी 2 लाखापेक्षा कमी रुग्ण! रिकव्हरी रेटही वाढला

मात्र पुन्हा ३६०० पेक्षा अधिक मृत्यू

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : सलग दोन दिवस राज्यासह देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग घटला आहे. गेल्या २४ तासांत देशात एकूण १ लाख ७३ हजार ७९० कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कमी रुग्णवाढ नोंदवण्यात आल्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळालाय. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या २४ तासांत २ लाख ८४ हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, हे सगळे दिलासादायक आकडे असले तरीही देशातील मृत्यूदराची चिंता काही केल्या कमी होत नसल्याचंच आकेडवारीतून स्पष्ट झालंय.

दिलासादायक आकडेवारी

देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावलाय. सलग दुसऱ्या दिवशी २ लाखापेक्षा कमी रुग्णांची भर पडली आहे. तर तब्बल २ लाख ८४ हजार ६०१ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आलाय. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ इतकी नोंदवण्यात आली आहे. तर यापैकी २ कोटी ५१ लाख ७८ हजार ११ रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत. दरम्यान, सध्याच्या घडीला देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही २२ लाख २८ हजार ७२४ इतकी नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’ कोवॅक्सीन लसीसाठीच्या औषधाचे उत्पादन करणार

मृत्यूदर कायम!

रुग्णवाढ घटली असली, आणि रिकव्हरी रेट वाढला असला, तरीही देशातील मृत्यूदर काही केल्या कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा ३ हजार ६१७ कोरोना रुग्णांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, आतापर्यंत देशभरात एकूण ३ लाख २२ हजार ५१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे एप्रिल महिन्याच्या शेवटापासून नोंदवण्यात आले असून मे महिना संपत आला असला तरीही कोरोनाचा देशातील मृत्यूदर कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

हेही वाचा : कॅसिनो कंपनी म्हणते कर्फ्यू वाढणार ?

लसीकरण आणि सक्रिय रुग्ण

दरम्यान, देशातील एकूण २० कोटी ८९ लाख २ हजार ४४५ जणांचं लसीकरण झाल्याची आकडेवारीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तर दुसरीकडे सक्रिय रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार सक्रिय रुग्णसंख्या ही १ लाख १४ हजार ४२८ने घटली असल्याचं गेल्या २४ तासांत पाहायाल मिळालंय. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी रे हा १० टक्क्यांपेक्षा खाली असल्याची नोंद सलग गेले पाच दिवस केली जाते आहेत. सध्याच्या घडीला देशाचा रिकव्हरी रेट हा ९०.८० टक्के इतका आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ९.८४ टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा ८.३६ टक्के इतका नोंदवण्यात आलाय.

हेही वाचा : गोमेकॉत झालेल्या मृत्यूंना मुख्यमंत्री, आरोग्यमंत्रीच जबाबदार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!