पहिल्या सामन्यात टीम इंडिया ‘सिकंदर’…

हरारे एकदिवसीयमध्ये झिंबाब्वेचा १० गडी राखून पराभव : चहर, कृष्णा, अक्षरची शानदार गोलंदाजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

हरारे : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने झिंबाब्वेचा १० गडी राखून पराभव केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. झिंबाब्वेचा संघ प्रथम खेळून १८९ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ३०.५ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. झिंबाब्वेचा अनुभवी फलंदाज सिकंदर रझाही विशेष काही करू शकला नाही व १२ धावा करून बाद झाला. मालिका सुरू होण्यापूर्वी सिकंदरने विजयाचे मोठमोठे दावे केले होते.
हेही वाचा:Crime | गोव्यातील ड्रग्सचे धागेदोरे हैदराबादपर्यंत!

भारताचा हा पहिला विजय

भारतासाठी गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. गिलने नाबाद ८२ आणि धवनने नाबाद ८१ धावा केल्या. याआधी, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक चहर यांनी गोलंदाजीत प्रत्येकी तीन बळी घेतले होते. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिला विजय आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सलामी जोडी शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी शानदार फलंदाजी करत पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या. यानंतर यजमान संघाच्या गोलंदाजांविरुद्ध दोघांनी वेगवान धावा केल्या. दरम्यान, धवनने ७६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि २० व्या षटकात भारताला १०० धावांच्या पुढे नेले.
हेही वाचा:फातोर्डातील एका वेटरचा मृत्यू, ‘हे’ आहे कारण…

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी

यानंतर गिलने वेगवान फलंदाजी करत ५१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे भारताची धावसंख्या २६ षटकांत १५३ धावांपर्यंत पोहोचली. तरीही पाहुण्या संघाला विजयासाठी २४ षटकांत ३७ धावांची गरज होती. यादरम्यान दोन्ही फलंदाजांना झिंबाब्वेचे गोलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले. यासह शिखरने ३०.५ षटकांत चौकार मारून भारताला १० विकेटने विजय मिळवून दिला. शिखर ११३ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ८१ धावा तर गिलने ७२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा:चिखलीत अमली पदार्थ तस्करी प्रकरणी एकाला अटक…

झिंबाब्वेने ३९.२ षटकांत ९ गडी गमावून केल्या १८० धावा

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना झिंबाब्वेची सुरुवात खराब झाली. त्यांनी १०.१ षटकांत ३१ धावांत चार महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. दरम्यान, इनोसंट कैया (४), तडीवानसे मारुमणी (८), शॉन विल्यम्स (५), वेस्ली माधेवरे (१) आणि सिकंदर रझा (१२) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. झिंबाब्वेचा निम्मा संघ अवघ्या ६६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रायन बुरले (११) २०.५ षटकांत कृष्णाच्या गोलंदाजीवर शुभमन गिलकडे झेलबाद झाला आणि झिंबाब्वेला ८३ धावांवर सहावा धक्का दिला. कर्णधार रेगिस चकाबवाने काही चांगले शॉट्स खेळून संघासाठी महत्त्वाच्या धावा जोडल्या, मात्र २६.३ षटकांत चकाबवा (३५) अक्षरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर अक्षरनेही ल्यूक जोंगवेलाही (१३) माघारी पाठवले. यामुळे यजमानांनी ११० धावांत आठ विकेट गमावल्या.यानंतर ब्रॅड इव्हान्स आणि रिचर्ड नागरवा यांनी भारतीय गोलंदाजांचा सामना करत अनेक आकर्षक फटके मारले. दोघांमधील मोठी भागिदारी (६५ चेंडूत ७० धावा) प्रसिद्ध कृष्णाने मोडली. त्याने रिचर्ड नागरवा (३४) याला बाद करत तिसरा बळी घेतला. झिंबाब्वेने ३९.२ षटकांत ९ गडी गमावून १८० धावा केल्या.
हेही वाचा:करोना नियमांचे पालन करा : बोरकर…

भारताचा पुढील सामना २० ऑगस्ट रोजी

पुढच्याच षटकात अक्षरने व्हिक्टर न्युचीला (८) झेलबाद केल्याने यजमानांचा डाव ४०.३ षटकांत १८९ धावांत गुंडाळला गेला. इव्हान्स ३३ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर महम्मद सिराजने एक विकेट घेतली. भारताचा पुढील सामना आता याच मैदानावर २० ऑगस्ट रोजी होणार आहे.
हेही वाचा:Crime | पर्रात घर फोडून पळवला ऐवज…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!