CORONA |भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय

अमेरिकेतील प्रख्यात साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांचं मत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: भारतातील अनेक राज्यांत अनेक निर्बंध लागू केल्यानंतरही करोना संक्रमणाचा वेग काही नियंत्रणात येतान दिसत नाही. अनेक राज्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. याच दरम्यान, भारतासारख्या देशात करोना साखळी तोडण्यासाठी काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं मत अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांनी केलंय. ‘त्वरीत’ काही दिवस देशात ‘संपूर्ण लॉकडाऊन’ लागू केल्यास कोविडवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं, असं विधान ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. फौसी यांनी केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ. अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार  म्हणून जबाबदारी हाताळत आहेत.

‘भारतात कठीण परिस्थिती ‘

भारतात ज्या पद्धतीनं करोना संक्रमणाचा फैलाव दिसून येतोय, त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि बेडसाठी झगडावं लागतंय. औषधांचा काळाबाजार सुरू आहे. लोक आणि प्रशासन हतबल होताना दिसत आहेत. काय करावं? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या करोनामुळे भारत सध्या मोठ्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. अशावेळी ‘त्वरीत’ काय करता येऊ शकतं? अशा स्थितीत देशासमोर काही आठवड्यांसाठी संपूर्ण हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहतो.

हेही वाचाः CORONA UPDATE | भयंकर! देशातील कोरोना मृतांचा आकडा पुन्हा वाढला

लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज

बायडन प्रशासनाचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी लसीकरण मोहिमेला जोर देण्याची गरजही व्यक्त केली. पुढच्या काही आठवड्यांत लसीकरण मोहिमेला वेग धेण्यात आला तर या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकेल. कारण, सध्या भारतात अत्यंत गोंधळाचं वातावरण आहे. लोक रस्त्यांवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन धावताना दिसत आहेत. रुग्णालयांत दाखल होण्यासाठीही रुग्ण रांगेत उभे असल्याचं दिसून येतंय.

हेही वाचाः OXYGEN | ‘जीएसएल गोवा’ प्रदान करणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

नियंत्रणासाठी केंद्रीय समितीची गरज

डॉ. फौसी यांनी आत्तापर्यंत सात अमेरिकन राष्ट्रपतींसोबत काम केलंय. भारतात मेडिकल ऑक्सिजनसाठी लढाई सुरू आहे. त्यामुळे त्वरीत ऑक्सिजन आणि औषधाच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची गरज आहे, अशी गरजही डॉ. फौसी यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचाः प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन

‘वैश्विक असमानतेचं उदाहरण’

या अगोदर ‘द गार्डियन’शी बोलताना, भारतात निर्माण झालेली परिस्थिती वैश्विक असमानतेचं ढळढळीत उदाहरण असल्याचं डॉ. फौसी यांनी म्हटलं होतं. भारतातील करोना विषाणूचं थैमान रोखण्यासाठी पुरेशी मदत पोहचवण्यात विश्व अपुरं पडलंय. विकसीत आणि श्रीमंत देश जगभरात समान आरोग्य सेवा पोहचवण्यात अपयशी ठरलेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचाः स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घ्या

करोना संक्रमणात अमेरिका पहिल्या क्रमांकावर

उल्लेखनीय म्हणजे, करोना संक्रमणात जगभरात अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या तर ब्राझिल हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत 3,31,93,974 जणांना करोनानं गाठलंय तर एकूण 5,90,055 जणांचा मृत्यू झालाय. तर भारतात एकूण 1,91,64,969 रुग्ण आढळलेत तर 2,11,853 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!