कोरोना मृतदेहाच्या कपड्यांवर ब्रँडेड लोगोचा ‘गोरखधंदा’

मुद्देमालासह सात जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात !

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो न्यूज : स्मशानभूमीत, घाटावर कोरोनानं मृत्यू पावलेल्या मृतदेहांचे कपडे चोरुन विकणाऱ्या सात जणांना उत्तरप्रदेश-बागपत पोलिसांअंतर्गत येणाऱ्या बडौत पोलीसांनी अटक केलीय. अटक करण्यात आलेले आरोपी करोनाबाधित मृत व्यक्तीच्या शरीरावरील कपडे चोरी करुन त्यावर ब्रॅण्डेड कंपनीचे लोगो लावून पुन्हा बाजारात विकायचे असं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या सात जणांकडून मोठ्या संख्येने कपडे ताब्यात घेतलेत. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन दिलीय.

बडौत पोलीस स्थानकातील निरिक्षक अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी लॉकडाउनसंदर्भात पोलीस तपासणी सुरु असताना एका गाडीमध्ये ब्रॅण्डेड कपडे असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांना यासंदर्भात शंका आली. त्यांनी या कपड्यांच्या खरेदीसंदर्भातील बील आणि इतर कागदपत्रं मागितली. मात्र ही गाडी घेऊन जाणाऱ्यांकडे गाडीतील मालासंदर्भात काहीच कागदपत्रं नव्हती. पोलिसी खाक्या दाखवल्यावर या लोकांनी आपण मृतांच्या शरीरावरील कपडे चोरुन विकत असल्याचं मान्य केलं. हे लोकं मृतांच्या शरीरावरील कपडे चोरायचे. नंतर ती कपडे धुवून त्यावर ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो लावून ते विकायचे. पोलिसांनी सात लोकांना अटक केली असून त्यांच्याकडे मृतदेहावर टाकण्यात येणाऱ्या 520 चादरी, 127 कुर्ते, 140 पॅण्ट, 34 धोतरं, 12 गरम शाली, 52 साड्या, तीन रिबिन्सची पाकिटं, 158 ब्रॅण्डेड कपड्यांचे स्टीकर्स सापडले आहेत.
पोलिसांनी तपास केला असता मरण पावलेल्यांच्या अंगावरील कपडे विकणाऱ्याचा हा उद्योग मागील दोन वर्षांपासून सुरु होता. मागील वर्षी कोरोनासारखा संसर्गजन्य रोगामुळे अनेकजण दगावत असतानाही या लोकांनी हा मृतदेहांवरील कपडे चोरण्याचा उद्योग सुरु ठेवला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन तुरुंगामध्ये पाठवलं आहे.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे बडौतचे रहाणारे आहेत. यामध्ये श्रीपाल जैन, आशीष जैन, राममोहन, अरविंद जैन, ईश्वर, वेदप्रकाश, मोबीन या सात जणांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!